कल्याणीनगर ‘पोर्श’अपघात प्रकरणात अल्पवयीन कार चालकावर प्रौढ म्हणून फौजदारी खटला चालविण्याची मागणी पुणे बाल न्याय मंडळाने फेटाळल्यानंतर पुणे पोलिसांनी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. बाल न्याय मंडळाच्या निर्णयात त्रुटी असल्याचा दावा करून, पुणे पोलिसांनी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी दिली.
‘पोर्श’ कार चालकाचा गुन्हा निर्घृण (हिनिअस) श्रेणीत मोडत नसल्याचा निकाल बाल न्याय मंडळाने दिला होता. मात्र, या निकालात स्पष्टता नसल्याचा दावा करून, पुणे पोलिसांनी सत्र न्यायालयात अपील केले आहे.
कल्याणीनगर येथे 18 मे 2024 च्या मध्यरात्री अल्पवयीन मुलाने ‘पोर्श’ कार भरधाव चालवून दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवर बसलेल्या अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला. या अपघातापूर्वी ‘पोर्श’ कार चालक मुलगा व पाठीमागील आसनावर बसलेल्या त्याच्या दोन मित्रांनी मुंढव्यातील दोन पबमध्ये मद्यपान केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले होते. त्यामुळे पुणे पोलिसांनी कारचालक मुलावर प्रौढ म्हणून फौजदारी खटला चालवावा, अशी मागणी करणारा अर्ज बाल न्याय मंडळात सादर केला.
