छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ५ दिवसांपूर्वी ३३ वर्षीय महिला रक्षाबंधनाच्या दिवशी दोन भावांना राखी न बांधताच माहेरहून अचानक बेपत्ता झाली. दुसऱ्या दिवशी वडिलांच्या शेतातील विहिरीत तिचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी सकाळी सात वाजता फुलंब्री तालुक्यातील कान्होरी शिवारात उघडकीस आली. महिलेने आत्महत्या केली की हत्या? याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीय. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.
छाया अंकुश उबाळे (वय ३३, रा. जटवाडा, ता. छत्रपती संभाजीनगर) असं मृतदेह आढळलेल्या महिलेचं नाव आहे. या प्रकरणी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, छाया उबाळे या जटवाडा भागात पती दोन मुले यांच्यासह राहत होत्या. छाया पाच दिवसांपूर्वी फुलंब्री तालुक्यातील कान्होरी येथे माहेरी आई-वडिलांकडे भेटण्यासाठी आल्या होत्या. शनिवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास रक्षाबंधन असल्यानं भाऊ बहीण राखी बांधेल याची वाट बघत होते. मात्र राखी बांधण्यापूर्वीच छाया बेपत्ता झाल्या. यामुळे वडील व नातेवाईक यांनी छाया यांची शोधाशोध केली. मात्र त्या आढळून आल्या नाहीत. दरम्यान या प्रकरणी फुलंब्री पोलीस ठाणे गाठून बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली. पोलिसांनी शोध मोहीम राबवल्यानंतर छाया यांचा मृतदेह त्यांच्याच वडिलांच्या शेतातील विहिरीत आढळून आला. पोलीस व नागरिकांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढला. तात्काळ ग्रामीण रुग्णाला दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलं. त्यांच्यावर दोन वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.
