भारतीय जनता पार्टीकडून निवडणुकांमध्ये ‘मतांची चोरी’ सुरु असून त्याला केंद्रीय निवडणूक आयोगाचा पाठिंबा असल्याचा घणाघाती आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केल्यानंतर आज ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चाला दिल्ली पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. मात्र विरोधी पक्षातील खासदार मोर्चावर ठाम असून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयाभोवती सात स्तरांचं बॅरिकेटींग केलेलं असतानाही विरोधी पक्षातील खासदारांनी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत मोर्चा काढला. या मोर्चाला पोलिसांनी आडवलं. त्यानंतर अनेक खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अनेक खासदारांना एकत्रच खासगी बसमध्ये बसवण्यात आलं आहे. दुसरीकडे या मोर्चाचं नेतृत्व करत असणाऱ्या राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे.