मुंबईत सध्या कबुतरखान्यांचा मुद्दा चर्चेत असून महापालिकेने आरोग्याच्या कारणास्तव कबुतरखाने बंद केल्यानंतर जैन समाजाने रस्त्यावर उतरुन आक्रमकपणे आंदोलन केलं. दरम्यान हायकोर्टाने पुढील आदेशापर्यंत कबुतरांना अन्न, पाणी देऊ नये असा आदेश दिला आहे. या प्रकरणावरुन राजकारणही तापलेलं दिसत आहे. दरम्यान मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी माणूस जगणं महत्वाचं की कबुतरं? असा सडेतोड प्रश्न विचारला आहे. तसंच जैन सोसायट्यांमध्ये कबुतरखाने उभारा असा सल्लाच देऊन टाकला आहे. ‘झी 24 तास’चे संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या ‘टू द पॉईंट’ मुलाखतीत त्यांनी हे विधान केलं आहे.
“कबुतरखान्यामुळे पर्यटनाचं नुकसान होत आहे. लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. अशा गोष्टी दिसत असताना आपला आग्रह माणसं जगवण्याला आहे की कबुतरं जगवण्याला आहे? माणसं जगली तर कबुतराला दाणा घालतील ना? पण तीच माणसं मरणार असतील तर काय करणार आहात?,” अशी विचारणा बाळा नांदगावकरांनी केली आहे.
पुढे ते म्हणाले की, “जीवदया करायची असेल तर माझ्या इथे करतो ना. माझ्या घरात पोपट आला पाहिजे, चिमण्या आल्या पाहिजे, कबुतरं आली पाहिजेत, असं वाटत असेल तर तुमच्या इथे हवं ते करा ना. माझं म्हणणं असं आहे की, जर हिंदूंनी एखादी सोसायटी बांधली तर तिथे गणपतीचं, हनुमानाचं मंदिर असतं. मुस्लिमांची वस्ती असेल तर तिथे मशीद उभारली जाते. जैन धर्माच्या सोसायटीत जैन मंदिर बांधलं जातं. तर मग माझं म्हणणं आहे जैन बाधवांना वाटत असेल तर तिथेच आजुबाजूला कबुतरखान्यासारखी जागा बांधा. सोसायटीमधील सोसायटीत करा”.
“लोढा इतके मोठे मोठे प्लॉट घेतात. त्या प्लॉटमधील एखादी अर्धा एकर जमीन तिकडे बाजूला ठेवा आणि कबुतरांचं करा. लोकांना त्रास होणार नाही. तुम्हाला जी हवी ती जीवदया भूतदया करा. दादरमध्ये पिढ्यानपिढ्या तो कबुतरखाना आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर हा मुद्दा ऐरणीत आला. मग कोर्टाचं ऐकणार नाही का? सन्मान करणार नाही का? ,” असं मत त्यांनी मांडलं आहे.
आंदोलकांवर गुन्हे दाखल होत नसल्याबद्दल विचारलं असता ते म्हणाले, “कायदा सर्वांना समान असला पाहिजे. आमच्याही कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होतात. आम्ही त्यांना यांनी लोकांसाठी, त्यांच्या हितासाठी हा गुन्हा केला आहे इतकंच सांगतो. कायदेशीर कारवाई केली पाहिजे असं आम्हीच पोलिसांना सांगतो. टोल फोडल्यानंतर खंडणीचे गुन्हे टाकले जातात. चुकीची गोष्ट असेल तर गुन्हा दाखल झालाच पाहिजे”.
