Air India चं नेमकं काय सुरुये? खासदारांनी सांगितला धक्कादयक अनुभव; विमानाच्या 2 तास हवेत घिरट्या आणि मग…

गेल्या काही महिन्यांमध्ये विमान दुर्घटना, आपात्कालीन विमान लँडिग, या आणि अशा कैक घटनांमुळं विमान प्रवास म्हटलं की अनेकांच्याच मनात आता भीती सर्वप्रथम घर करताना दिसत आहे. अशा या विमान प्रवासात आणखी एक थरारक घटना नुकतीच घडली, जिथं खासदार असणाऱ्या विमानानं तब्बल दोन तास हवेत घिरट्या घातल्या आणि तिथंच अनेकांचं काळीज वेगानं धडधडण्यास सुरुवात झाली.

पुढे काय घडलं?

रविवारी रात्री तिरुवनंतपुरमहून दिल्लीकडे येत असलेली एअर इंडियाची AI‑2455 फ्लाइट थोड्याच वेळातच प्रवाशांना धडकी भरवून गेली. हवामानातील अस्थिरता, वाऱ्याची दिशा आणि वेग आणि तांत्रिक समस्येमुळं या विमानानं अतिशय मोठं संकट जवळून पाहिलं. उड्डाणानंतर लगेचच विमानाला जोरदार टर्ब्युलन्सचा सामना करावा लागला.

वळपास तासाभरानंतर वैमानिकानं फ्लाइटमध्ये सिग्नल फॉल्ट असल्याची घोषणा केली आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने विमान चेन्नईकडे वळवण्याचा निर्णय घेतला. विमान चेन्नईत उतरवण्याच्या पहिल्याच प्रयत्नात एका रनवेवर दुसरंही विमान उभं होतं. आता इथं मोठा धोका होता, कारण, दोन विमानांची टक्कर झाली असती तर मोठं संकट ओढावलं असतं. मात्र कॅप्टनने तात्काळ “गो‑अराउंड” या सुरक्षित निर्णयाने विमान पुन्हा उडवून दुसऱ्या प्रयत्नात यशस्वीरित्या लँड केलं. दरम्यान एअर इंडियानं या परिस्थिती आणि प्रसंगामागचं मुख्य कारण तांत्रिक बिघाड आणि खराब हवामान असल्याची माहिती दिली. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे एअर इंडियानं रनवेवर दुसरं कोणतंही विमान असल्याची बाब स्पष्टपणे नाकारली आहे.

विमानात होते खासदार…. सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलं?

केसी वेणुगोपाल यांनी X च्या मध्यमातून लिहिलेल्या माहितीनुसार एअर इंडियाचं विमान AI 2455 अतिशय भीतीदायक प्रसंगातून बचावलं असून यामध्ये अनेक खासदार आणि शेकडो प्रवासीसुद्धा होते. आधीच विमानाचा प्रवास उशिरानं सुरू झाला आणि त्यानंतर त्याचा एका भयंकर प्रसंगाचा सामना करावा लागला असंही त्यांनी स्पष्ट केलं. या विमानप्रवासात नेमकं काय घडलं यासंदर्भातीस माहिती देत वेणुगोपाल यांनी जवळपास दोन तास आपण विमान लँड होण्याची वाट पाहत होतो, जेव्हा विमान पहिल्यांदा रनवेवर उतरवण्याच प्रयत्न झाला तेव्हा नेमकं काय घडलं याची माहिती देत दोन विमानांची टक्कर होता होता राहिली असं त्यांनी स्पष्ट केलं. सदर प्रसंगातून आपण वैमानिकाचं कौशल्य आणि नशिबाची साथ असल्या कारणानं बचावलो असं सांगत त्यांनी DCGA कडे तात्काळ या घचनेची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली.

एअर इंडियाचं या घटनेवर काय म्हणणं?

एअर इंडियाच्या प्रवक्त्यांकडून तिरुवअनंतपूरमहून विमान चेन्नईच्या दिशेला वळवलं जाण्यामागे तांत्रिक कारण असल्याचं स्पष्ट केलं. संभाव्य तांत्रिक बिघाड आणि विमान प्रवासादरम्यान अचानक बदललेल्या हवामानामुळं विमानाच्या लँडिंगचं ठिकाण बदलल्याचं सांगितलं. विमान चेन्नईत उतरवल्यानंतर त्याची आवश्यक ती तपासणी आणि पाहणी करण्यात येत असून प्रवाशांना झालेल्या गैरसोयीसाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, असं एअर इंडियाच्या अधिकृत माहिती पत्रकात म्हटलं गेलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *