मुंबईतील नालासोपारा परिसरात एक धक्कादायक आणि हादरवून सोडणारी घटना उघडकीस आली आहे. जादूटोणा आणि भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली एका भोंदूबाबाने 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विरार पोलिसांनी शुक्रवारी 22 वर्षीय भोंदूबाबासह त्याच्या मित्राला अटक केली आहे. ही घटना नालासोपारा येथील राजोडी परिसरात घडली असून या प्रकरणाने परिसरात संतापाची लहर उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी 17 वर्षीय असून ती मंदिरात गेल्यावर तिला अस्वस्थ वाटत होते. या अस्वस्थतेमुळे ती जादूटोणा आणि भूतबाधा उतरवण्याचा दावा करणाऱ्या या भोंदूबाबाच्या संपर्कात आली. भोंदूबाबाने तिला सांगितले की, तिच्या अंगात भूत आहे आणि ते उतरवण्यासाठी तिला त्याच्याशी शरीरसंबंध ठेवावे लागतील. या फसव्या आणि धोकादायक दाव्याने मुलगी गोंधळात पडली आणि ती त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्याच्या सांगण्यानुसार वागली.
भोंदूबाबा आणि त्याचा मित्र मुलीला नालासोपारा येथील राजोडी परिसरातील एका लॉजमध्ये घेऊन गेले. तिथे भोंदूबाबाने जुलै ते ऑगस्टदरम्यान अनेकदा तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या काळात त्याचा मित्रही या गुन्ह्यात सहभागी होता. मुलीवर मानसिक दबाव आणून तिला मौन बाळगण्यास भाग पाडण्यात आले. मात्र, मुलीने तिच्यासोबत घडलेला हा संपूर्ण प्रकार आपल्या मैत्रिणीला सांगितला. ज्याने ही बाब समोर आली आहे.
या घटनेमुळे नालासोपारामधील नागरिक संतप्त
शुक्रवारी विरार पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन भोंदूबाबा आणि त्याच्या मित्राला अटक केली. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. पीडित मुलीच्या निवेदनावरून पोलिसांनी दोघांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
या घटनेमुळे नालासोपारा आणि परिसरात संतापाची लाट पसरली आहे. अशा भोंदूबाबांनी समाजात विश्वासार्हतेचा गैरफायदा घेऊन निरपराध लोकांचे शोषण केल्याच्या घटना आता वाढत चालल्या आहेत. स्थानिक नागरिकांनी असा प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनाकडून कडक कारवाईची मागणी केली आहे. तसेच, अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता पसरवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
