मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) नुकतच दादर रेल्वे स्थानकावर बलिया-दादर एक्सप्रेसमधून सुमारे दोन टन (2000 किलो) बेकायदेशीर गुटखा आणि पान मसाला जप्त केला. जप्त केलेल्या मालाची अंदाजे किंमत साडेसहा लाख रुपये आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. आरपीएफद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 01026 बलिया एक्सप्रेस शनिवारी सकाळी 7:45 वाजता दादर स्थानकावर आल्यानंतर हा बेकायदेशीर साठा उघडकीस आला.
नेमकी घटना काय?
आरपीएफद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधून मुंबईला येणारी गाडी क्रमांक 01026 बलिया एक्सप्रेस शनिवारी सकाळी 7:45 वाजता दादर स्थानकावर आल्यानंतर हा बेकायदेशीर साठा उघडकीस आला. कर्तव्यावर असलेले पार्सल लिपिक उदय खरे यांच्या देखरेखीखाली एकूण 29 पुडकी असलेली दोन टपाल फलाट 13 आणि 14 वर उतरवण्यात आले. दुपारी 2 वाजता आरपीएफचे हेड कॉन्स्टेबल सोहनलाल जाटव यांना त्या बेकायदेशीर टपालातून पान मसाला आणि तंबाखूचा तीव्र वास येत असल्याचे आढळले. त्यांनी दादर येथील आरपीएफ निरीक्षकांना सूचना दिली. उपनिरीक्षक नरसिंग मीना आणि त्यांच्या पथकासह घटनास्थळी तपासणी सुरू करण्यासाठी पोहोचले.
दादर रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
दोन साक्षीदारांच्या उपस्थितीत, सर्व 29 टपाल उघडण्यात आले आणि त्यात तंबाखू, केसर-मिश्रित पान मसाला आणि इतर प्रतिबंधित तंबाखूजन्य उत्पादने आढळले. ज्यांचे वजन सुमारे 1892.2 किलो होते. या सर्व वस्तू सीलबंद करून जप्त करण्यात आल्या. 4 ऑगस्ट रोजी जप्त केलेला माल पुढील कायदेशीर कारवाईसाठी दादर रेल्वे पोलिसांकडे पाठवण्यात आला.