मंगळवार (5 ऑगस्ट 2025) रोजी उत्तराखंडच्या उत्तरकाशी क्षेत्रात येणाऱ्या धराली भागात झालेल्या ढगफुटीनंतर महापूर आला. खीरगंगा नदीच्या पात्रानं सर्व मर्यादा ओलांडत डोंगरावरून मैदानी क्षेत्र गाठलं, मात्र वाटेत येणारी प्रत्येक गोष्ट या भूस्खलन आणि पाण्याच्या लोंढ्यात नष्ट झाली. एकिकडे या संकटाची व्याप्ती दर दिवशी वाढत असतानाच दुसरीकडे एक अतिशय धास्तावणारी माहिती समोर आली आणि काही बाबतीत हलगर्जीपणा नेमका किती मगागात पडू शकतो हेसुद्धा लक्षात येत आहे.
इस्रोच्या संशोधकांचं निरीक्षण आणि उत्तराखंड…
उत्तराखंडच्यचा धरालीमधील सध्याची आपत्ती पाहता, वर्षभरापूर्वीच इस्रोच्या संशोधकांनी अशा संभाव्य संकटाचे संकेत एका अध्ययनाच्या माध्यमातून दिले होते. ‘अमर उजाला’नं इस्रोतील सूत्रांच्या हवाल्यानं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार सदर निरीक्षणाचा अहवाल उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे सोपवण्यातही आला होता. मात्र, तो अहवाल नेमका कुठं गेला, त्यावर काही अंमलबजावणी झाली की नाही, याबबातची माहिती मात्र समोर आलीच नाही.
इस्रोच्या निरीक्षणातून काय निष्पन्न झालं?
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं या भागात केलेल्या निरीक्षणानुसार 6133 मीटर उंचीच्या श्रीकंठ पर्वतारील ग्लेशियर सातत्यानं वितळत असून, वर्षभरापूर्वीच आयआयआरएस-इस्रोच्या संशोधकांनी या संपूर्ण खोऱ्याचा अभ्यास आणि निरीक्ण केलं होतं. उपग्रहांच्या माध्यमातून मिळालेल्या माहिती आणि छायाचित्रांच्या आधारे करण्यात आलेल्या या निरीक्षणानुसार या खोऱ्यातील उंचवट्यावर असणाऱ्या बहुतांश भागांमध्ये लहानमोठे जलस्त्रोत निर्माण झाल्याचं स्पष्ट होत होतं.
पर्वतावर तयार होणाऱ्या या जलस्त्रोत आणि जलसाठ्यांना अधोरेखित करत 4000 मीटर किंवा त्यापेक्षा उंचीवरील भागात पाऊस झाल्यास प्रचंड मोठं संकट ओढावू शकतं असा स्पष्ट इशारा इस्रोच्या या संशोधकांनी दिला होता. या संपूर्ण परिस्थितीवर भाष्य करणारा अहवाल यूएसडीएमकडे सोपवूनही त्यासंदर्भात विचारलं असता मात्र काहीही कल्पना नसल्याचच उत्तर मिळाल्याचं इस्रोकडून सांगण्यात आलं.
आपत्ती व्यवस्थापन विभागाला अहवालाची कल्पनाच नाही?
सूत्रांच्या माहितीनुसार आपत्ती व्यवस्थापन विभाग या अहवालापासून पूर्णपणे अनभिज्ञ असून, संशोधकांच्या इतक्या मोठ्या इशाऱ्याकडे गांभीर्यानं न पाहिल्यानंच इतकी मोठी हानी झाली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्याच्या घडीला संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडूनही इस्रोच्या अशा अहवालाची माहिती नसल्याचं म्हणत तो अहवाल नेमका कधी आणि कोणाकडे देण्यात आला होता, त्यात खरंच या आपत्तीच्या संकेतांना अधोरेखित करण्यात आलं होतं? असे प्रश्न उपस्थित करत आताच्या घडीला या परिस्थितीवर भाष्य करणं योग्य नसल्याची भूमिका मांडली.
दरम्यान, इस्रोनं नुकतंच सोशल मीडियावर उत्तराखंडच्या धराली भागातील उपग्रहाच्या माध्यमातून टीपलेली छायाचित्र समोर आणली. जिथं पहिलं छायाचित्र 13 जून 2024 रोजीचं तर, दुसरं 7 ऑगस्ट 2025 चं असल्याचं स्पष्ट दिसत आहे. नदीच्या पात्रानं व्यापलेलं क्षेत्र आणि झालेला विध्वंस या दोन्ही छायाचित्रांमध्ये अगदी स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळं आता या प्रकरणावर उत्तराखंड प्रशासनाची पुढील भूमिका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
