सोन्याच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, असे प्रलोभन दाखवून झवेरी बाजारातील तीन व्यापाऱ्यांनी अनेकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. गुंतवलेले ३६ किलो सोने आणि सुमारे १० कोटी रोख असा सुमारे ४४ कोटी रुपयांचा ऐवज या व्यापाऱ्यांनी डब्बा ट्रेडिंग मध्ये गुंतवला. मात्र, ही रक्कम बुडाल्याने व्यवसायात तोटा झाल्याचे सांगत त्यांनी हात वर केले. या तीन व्यापाऱ्यांविरुद्ध लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, पश्चिम उपनगरात वास्तव्यास असलेल्या व्यापाऱ्याचे झवेरी बाजारात दुकान असून, त्याचा सोन्याचे दागिने खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. त्याची ओळख याच परिसरातील नावाजलेल्या मॅक्सिस बुलियन आणि पल्लव गोल्डच्या लादुलाल, पल्लव आणि शुभम यांच्यासोबत झाली. या तिघांनी आपल्याकडे व्यवसायाच्या वेगवेगळ्या योजना असून यामध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आश्वासन दिले. हे तिघे नावाजलेले असल्याने व्यापारी आणि त्यांच्या नातेवाइकांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि सुरुवातीला सुमारे दोन कोटी रुपये गुंतविले. या गुंतवणुकीवर चांगला मोबदला मिळाल्याने या व्यापाऱ्याचा तिघांवरील विश्वास अधिक दृढ झाला.
एकही धनादेश वटला नाही
व्यापारी आणि त्याच्या नातेवाइकांनी त्यानंतर टप्प्याटप्प्याने ३६ किलो सोने आणि सुमारे १० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, यावर काहीच परतावा न मिळाल्याने त्यांनी तिघांकडे तगादा लावला. त्यावेळी तिघांनी वेगवेगळ्या बँक खात्यांचे धनादेश दिले. मात्र, यातील एकही धनादेश वटला नाही. या तिघांनी सुमारे ४४ कोटींचा ऐवज डब्बा ट्रेडिंगमध्ये गमावल्याचे व्यापाऱ्याला कळले. त्यावरून त्यांनी लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवरून लादुलाल, पल्लव आणि शुभम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
डब्बा ट्रेडिंग म्हणजे?
शेअर डब्बा ट्रेडिंग म्हणजे शेअर बाजारामध्ये अधिकृत नोंदणी न करता शेअर बाजाराच्या बाहेर चालणारी एक बेकायदा ट्रेडिंगची पद्धत. यात, ब्रोकर गुंतवणूकदारांना बाजाराच्या बाहेर व्यवहार करण्यासाठी प्रोत्साहित करतात. यावर कुणाचेही नियंत्रण नसते. तसेच, यामुळे कोणतेही कर भरावे लागत नसल्याने शासनाचे नुकसान होते. शेअर बाजारापेक्षा यात चांगला परतावा मिळतो, असे भासविले जाते.