पुणे आयुक्तांच्या बंगल्यातून एसी, टीव्ही, झुंबर गायब तरी तक्रार नाही? चोरीचं गूढ कसं उकलणार?

आजवर आपण अनेक चोरीच्या घटनांबाबत ऐकलं असेल..मात्र आता थेट पुणे महापालिका आयुक्तांच्या बंगल्यात मोठी चोरी झालीय.एसी, टीव्ही, झुंबर यासारख्या अनेक महागड्या वस्तू बंगल्यातून गायब झाल्या. आयुक्त निवृत्त झाले. पण बंगल्यातील वस्तूंना पाय फुटले का, असा सवाल आता विचारला जातोय.

पुणे महापालिकेच्या आयुक्तांच्या बंगल्यातून लाखोंचं साहित्य गायब झालंय. यामध्ये एसी झुंबर, टीव्ही, अॅक्वागार्ड यासह लाखो रुपयांचं साहित्य गायब झालंय. मॉडेल कॉलनी इथं आयुक्तांचा हा बंगला आहे.विशेष म्हणजे या बंगल्याला कडक सुरक्षा व्यवस्था असते.. मात्र तरिही बंगल्यातील वस्तू कशा गायब झाल्या याबाबत प्रश्न उपस्थित होतोय.

बंगल्याची जबाबदारी नेमकी कुणाची?

चौफेर सीसीटीव्ही, २४ तास सुरक्षा पण तरीही एकूण २० लाखांचं सामान गायब झाल्याचं स्पष्ट झालंय.आता आयुक्त नवलकिशोर राम बंगल्यात राहायला येणार आहेत, त्यामुळे ‘पूर्ववत व्यवस्था’ करण्याची लगबग सुरू झालीय. पण जुनी व्यवस्था कुठे गेली, हेच कोडं अजून उलगडलं नाही.तर या बंगल्याची जबाबदारी नेमकी कुणाची? याचं कोणतंच ठोस उत्तर मिळालं नाहीय…यावर आता पालिका आयुक्तांनी चौकशी करून कारवाई करणार असल्याचं म्हटलंय.

बंगल्यातलं हे गूढ कोण उकलतंय?

महापौरांच्या बंगल्यातून १० वर्षांपूर्वी टीव्ही चोरी गेला होता, तो चोर अजूनही सापडलेला नाही.आणि आता आयुक्त बंगल्यातून गायब झालेलं लाखोंचं सामान पण अजून कुणीही पोलिसांत तक्रार केली नाही तर, प्रशासकीय गोपनीयतेच्या नावाखाली या चोरीवर पडदा टाकायचा प्रयत्न होतोय का? असा सवाल उपस्थित होतोय. “कॅमेऱ्यावर लक्ष, पण घरात लक्ष नाय’ हेच म्हणावं लागेल. आता पाहावं लागेल की, बंगल्यातलं हे गूढ कोण उकलतंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *