मुंबईसह राज्यभरात पावासाने जवळपास 10 दिवसांहून अधिक काळ दडी मारली होती. मात्र आता पावसाने हजेरी लावली असून आज गुरुवारी मुंबईत पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली आहे. वांद्रे, अंधेरी, गोरेगाव, बोरिवलीमध्ये पाऊस सुरू आहे. दादर, हिंदमाता परिसरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.
पुढील 5 दिवसांत पावासाचा अंदाज
राज्यात पुढील 5 दिवसांत अनेक जिल्ह्यांत मेघ गर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर 3 दिवसांत काही जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे मुंबई आणि ठाण्यात पुढील 24 तासांत मेघ गर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातही पावसाचा अंदाज असून ही शेतकऱ्यांसाठी चांगली बाब आहे. मागील अनेक दिवसांपासून मराठवाड्यात पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे अनेक पिकं कोमेजून गेली आहे. पाऊस न पडल्यास मोठं नुकसान होण्याची भीती होती. मात्र आता मराठवड्यातही मेघगर्जनेसह चांगल्या पावासाचा अंदाज आहे.
कोकणातील काही भागात मुंबई, ठाणे आणि इतर ठिकाणी पुढील 2 ते 3 तासांत हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागात, मराठवाड्याच्या आसपासच्या भागात आणि पूर्व विदर्भात 3 ते 4 तासांत अधूनमधून हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.