मुंबईत गेल्या काही दिवसांपासून अत्याचार आणि मारहाणीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामध्ये लैंगिक अत्याचारांच्या घटना जास्त आढळत आहेत. मात्र, अशातच आता मुंबईतील चेंबूर येथील गोवंडी परिसरात एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर क्रिकेट प्रशिक्षणाच्या नावाखाली वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोरा आली आहे.
या संपूर्ण घटने प्रकरणी मुंबई पोलिसांनी 40 वर्षीय क्रिकेट प्रशिक्षकाला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार देवनार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महापालिकेच्या मैदानावर घडला आहे.
मुलीच्या तक्रारीनंतर संपूर्ण प्रकार उघडकीस
INS च्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही घाटकोपर येथील पंतनगरमधील रहिवाशी आहे. मात्र, ती गोंवडीमधील एका मैदानावर क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे. तिथे असणाऱ्या प्रशिक्षकाने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. आरोपीने घरी सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेला हा प्रकार घरी सांगितला नाही.
मात्र, तिच्या वागण्यामध्ये झालेला बदल पाहून तिच्या पालकांना संशय आला. त्यांनी तिला विश्वासात घेऊन तिची विचारपूस केली. त्यावेळी त्या मुलीने घडलेला प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांकडून तात्काळ कारवाई करण्यात आली आहे. सुरुवातीला पंतनगर पोलिस ठाण्यात झिरो एफआयआर नोंदवण्यात आला आणि त्यानंतर प्रकरण देवनार पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.
रणजी खेळाडू राहिलेला प्रशिक्षक अटकेत
सदर आरोपी हा क्रिकेटचा प्रशिक्षक असून तो भूतपूर्व रणजी खेळाडू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. प्रशिक्षकाच्या नावे अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप आहे. सध्या आरोपीला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
मुंबई पोलिसांनी घटनेबाबत गंभीर दखल घेतली असून, या प्रकारामागे आणखी कोणी संबंधित आहे का याचा तपास सुरू आहे. तसेच आरोपीने पूर्वीही अशा प्रकारचे कृत्य केले आहे का याबाबतही चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
क्रीडाक्षेत्रातील विश्वासाला तडा जाईल असा हा प्रकार समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम करणाऱ्या प्रशिक्षकांकडूनच असा प्रकार घडल्याने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.