तासगावातील गौरी हत्तिणीला ‘वनतारा’तून 2 कोटींची ऑफर, गणपती पंचायतनच्या विश्वस्तांचा दावा, निर्णय काय?

तासगावातील गणपती पंचायतन देवस्थान समितीच्या गौरी हत्तीला ‘वनतारा’कडून दोन कोटींची ऑफर आल्याने खळबळ उडाली आहे. या ऑफरला देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र परशुराम पटवर्धन यांनी ठामपणे नकार दिला. गौरीच्या संरक्षणासाठी येत्या संकष्टीला तासगावमध्ये सह्याची मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेत हजारो भक्त सहभागी होण्याची शक्यता आहे.

गौरी हत्ती : तासगावची अस्मिता

गौरी हत्तीला प्रेमाने ‘गजलक्ष्मी’ म्हणून संबोधलं जातं. ती तासगाव तालुक्याच्या सांस्कृतिक आणि भावनिक अस्मितेचे प्रतीक आहे. तिची योग्य काळजी घेण्यासाठी राजवाड्यात चारा, पाणी, आंघोळ आणि आरोग्याची सर्वतोपरी व्यवस्था केली जाते. गौरी दररोज तासगाव शहरात फेरफटका मारते, त्यामुळे ती स्थानिकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. मात्र, अलिकडच्या काळात हत्तींची हेळसांड होण्याचे प्रकार वाढत असल्याने स्थानिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

वनताराची ऑफर आणि धक्कादायक खुलासा

देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र पटवर्धन यांनी सांगितलं की, गवळी नावाच्या एका व्यक्तीने पशुवैद्यकीय विभागाचा अधिकारी असल्याचा दावा करत संपर्क साधला. त्याने गौरी हत्ती ‘अनफिट’ असल्याचं प्रमाणपत्र देण्याची तयारी दाखवत दोन कोटी रुपये देण्याची ऑफर केली. मात्र, पुढील पत्रव्यवहारातून ही व्यक्ती पशुवैद्यकीय विभागाशी संबंधित नसल्याचे उघड झाले. नांदणी मठातील माधुरी हत्ती प्रकरण ताजे असताना गौरीच्या बाबतीत असा प्रकार घडू नये यासाठी आम्ही सतर्क आहोत, असे पटवर्धन यांनी स्पष्ट केले.

सह्यांची मोहीम

नांदणी मठातील हत्ती प्रकरणानंतर तासगावातील गणपती पंचायतन देवस्थान समितीने ठाम भूमिका घेतली आहे. येत्या संकष्टीला गौरीच्या संरक्षणासाठी सह्यांची मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेत तासगावसह सांगली जिल्हा भरातून लोकं सहभागी होणार आहेत.

गौरी आमच्या कुटुंब आणि तासगाववासियांचा भाग आहे. तिच्या सुरक्षेसाठी आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही, असे पटवर्धन यांनी ठणकावून सांगितले. या मोहिमेत स्थानिक भक्त मोठ्या संख्येने सहभागी होऊन गौरीच्या संरक्षणासाठी एकजूट दाखवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

आम्ही गौरीला फोटोसाठीही कोणाला परवानगी देत नाही. तिच्या सुरक्षेसाठी आम्ही सर्वतोपरी खबरदारी घेत आहोत, असे त्यांनी नमूद केले. तासगावसह अन्य भागांतील देवस्थान समित्यांनाही वनताराकडून अशा ऑफर येत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे हत्ती संरक्षणाचा मुद्दा अधिक गंभीर बनला आहे.

पुढे काय?

येत्या संकष्टीला राबवण्यात येणारी सह्याची मोहीम हत्ती संरक्षण आणि जनजागृतीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. गौरी हत्तीच्या सुरक्षेसाठी तासगावातील जनता आणि देवस्थान समिती एकजुटीने पुढे येत असून, यामुळे हत्तींच्या हेळसांडीविरोधात मोठा संदेश जाईल, अशी आशा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *