भरधाव ट्रकचा ब्रेक फेल, स्कार्पिओला धडकून रस्त्यात पलटी, लोकांनी पळवली साखरेची पोती

साखरेची पोती घेऊन सांगलीहून मुंबईला निघालेल्या तथा ब्रेकफेल झालेल्या ट्रकची समोरील स्कार्पिओला जोरदार धडक बसली आणि ट्रक शेजारच्या कच्च्या रस्त्यावर पलटी झाला. पुणे-बंगळुरू महामार्गावर खंडाळ्यानजीकच्या एस कॉर्नरवर काल मंगळवारी सायंकाळी हा अपघात झाला. अपघातानंतर बेंगरूटवाडी परिसरातील नागरिकांनी ट्रकमधील साखरेची पोती पळवून नेली. खंडाळा पोलीस पोती पळवणाऱ्या संबंधितांचा शोध घेत आहेत.

एअर पाईप फुटल्याने ट्रकचे ब्रेक फेल

खंडाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साखरेची वाहतूक करणारा ट्रक (एम. एच. १० सी. आर. ४१९७) हा सांगलीहून मुंबईला निघाला होता. खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर एस कॉर्नरजवळ एअरपाईप फुटल्याने ट्रकचे ब्रेक निकामी झाले. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रकने समोरच्या स्कार्पिओला (एम. एच. १४ डी. एन. १५९६) धडक दिली. त्यामुळे ट्रक बेंगरूटवाडी गावच्या हद्दीत कच्च्या रस्त्यावर जाऊन पलटी झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून एक महिलाही किरकोळ जखमी झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *