पतीपासून विभक्त, 27 वर्षीय तरुणीला वकिलाने जाळ्यात ओढलं; आजारपणातही शरीरसंबंधांचा दबाव, दोनदा गर्भपात

पतीपासून विभक्त राहणाऱ्या 27 वर्षीय महिलेशी ओळख करुन वकिलाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. लग्नाचं आमिष दाखवून आधी हॉटेलमध्ये, आणि नंतर खोली घेऊन लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत महिलेचं लैंगिक शोषण केल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगर येथे उघडकीस आला आहे.

एवढंच नाही तर आजारी असताना देखील शरीरसंबंध ठेवण्यासाठी वकील मारहाण करत असल्याचा आरोप महिलेने केला आहे. या दरम्यानच्या काळात महिला दोन वेळेस गर्भवती राहिल्याने तिचा गर्भपात केला. लग्नाचा विषय काढल्यानंतर पीडितेला गाडीने उडवण्याची धमकी देऊन तो निघून गेला. या प्रकरणी सिडको पोलीस स्थानकात वकिलाच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेंद्र भगवान नैनाव, वय 34 वर्ष, राहणार सिडको, असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी 27 वर्षीय पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादी नुसार, पीडित महिलेचे 2018 मध्ये लग्न झाले होते. महिलेला सहा वर्षांचा मुलगा आहे. लग्नानंतर काही वर्षांनी महिलेचे पतीसोबत पटत नव्हते. त्यामुळे पती-पत्नीची कौटुंबिक न्यायालयात केस सुरु आहे.

न्यायालयीन प्रक्रियेच्या दरम्यान महिलेची न्यायालयात 8 मार्च रोजी आरोपी महेंद्र नैनाव याच्याशी ओळख झाली. मोबाईल नंबरची देवाणघेवाण झाल्यानंतर संपर्क वाढला. दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. पीडित महिला हॉस्टेलवर राहत असताना आरोपी 8 मार्च ते 12 जून दरम्यान तिला टीव्ही सेंटर भागातील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक शोषण केले. यामुळे पीडित महिला गर्भवती राहिली. आरोपी महेंद्रने तिला गर्भपात करायला सांगितला.

तुझं शिक्षण करतो, सोबत राहू

तुझं एलएलबीचं शिक्षण पूर्ण करून त्यानंतर तू माझ्यासोबत राहा असं आरोपीने पीडितेला सांगितलं. आपण खोली भाड्याने घेऊन राहू असं सांगून 12 जून रोजी पीडितेला सोबत घेऊन येत जय भवानीनगर येथे दोघे लिव्ह इन मध्ये राहू लागले.

मी हायकोर्टात वकील, सगळं मॅनेज करतो

पीडित महिलेने आरोपी महेंद्रकडे लग्नाची मागणी केल्यानंतर त्याने महिलेला धमकी दिली. मी हायकोर्टात वकील आहे, सगळं मॅनेज करू शकतो, तू मला जास्त शिकवू नको असं सांगून दुसऱ्यांदा गर्भपात करायला लावला. त्यानंतर लग्नाची मागणी केल्यानंतर बँकेत सेव्हिंग करुन सेटल होऊ दे, नंतर लग्न करू असं म्हणत तो पीडितेला आजारी असतानाही मारहाण करुन शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत होता.

दरम्यान तीन ऑगस्ट रोजी आरोपी पीडितेला गाडीने उडवण्याची धमकी देऊन निघून गेला. या प्रकरणाला कंटाळलेल्या पीडित महिलेने सिडको पोलीस ठाणे गाठत वकिलाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *