दौंड तालुक्यातील यवतमध्ये सध्या शांततेचं वातावरण आहे. काल घडलेल्या घटनेमुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. मात्र पोलिसांनी आता परिस्थिती आटोक्यात आणली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कलम १४४ लागू केल्याने आजही यवतमधील सर्व दुकानं आणि व्यापार बंद आहेत. नागरिकांनी घोळक्याने उभे राहू नये, कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असं आवाहन पोलीस करत आहेत. यवतमधील शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

शुक्रवारी दंगल घडवणाऱ्या आरोपींची पोलिसांनी रात्रीपासूनच धरपकड सुरू केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. मात्र यवत येथे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप यांची सभा झाली त्यावेळी याठिकाणी अनेकांची चिथावणीखोर भाषणं झाली.

नेमकं काय घडलं?

शुक्रवारी सकाळी एका तरुणाने मध्यप्रदेश इथे एका ६० वर्षाच्या महाराजाने दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केला असं एका चॅनेलवर आलेल्या बातमीचं स्टेटस ठेवलं होतं. हे निमित्त साधून ही संपूर्ण शहरात दंगल झाल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी आत्तापर्यंत २० जणांना अटक केली असून अजूनही अनेक जणांचा शोध सुरू आहे.

दुसरीकडे, यवतमध्ये चार दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना केल्याप्रकरणी तणाव निर्माण झाला होता. यावरुन यवतसह दौंड तालुक्यात बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. शिवरायांच्या प्रतिमेची विटंबना केलेल्या आरोपीला तात्काळ अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *