कोल्हापूर जिल्ह्यातील उदगाव येथे घडलेली एक विचित्र घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एका व्यक्तीने आपली पत्नी समजून, मृतावस्थेत सापडलेल्या अनोळखी महिलेचे अंत्यसंस्कार आणि सर्व धार्मिक विधी केले होते. मात्र त्यानंतर त्याची पत्नी जिवंत असल्याची माहिती समोर आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.
शिरोळ तालुक्यातील उदगाव येथील महेश महादेव ठाणेकर (वय 38) यांची पत्नी संजना ठाणेकर (वय 37) ह्या 19 जुलैपासून बेपत्ता होत्या. याबाबत 23 जुलै रोजी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, 29 जुलै रोजी मिरज तालुक्यातील बामणी येथील कृष्णा नदीपात्रात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला.
शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार विधी
नदीत सापडलेल्या महिलेची ओळख पटवण्यासाठी महेश ठाणेकर यांना मिरज शासकीय रुग्णालयात बोलावण्यात आले. मृतदेह नदीत सापडल्यामुळे शरीर फुगले होते, चेहरा ओळखू येण्यासारखा नव्हता. मात्र मृतदेहावरील कपडे, अंगावरील विशिष्ट खुणा आणि गालावर असलेला तीळ यांच्या आधारे महेश यांनी मृतदेह हा त्यांच्या पत्नीचाच असल्याचा दावा केला. त्यानुसार, संजनावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार विधी आणि रक्षाविसर्जनही 29 जुलै रोजी पार पडले.
सर्वांनाच मोठा धक्का
मात्र, दुसऱ्याच दिवशी म्हणजे 30 जुलै रोजी रक्षाविसर्जनाच्या दिवशी, संजना ठाणेकर स्वतः बचत गटाचे पैसे देण्यासाठी उदगावमध्ये परतल्या. त्यांना जिवंत पाहून गावकऱ्यांसह सर्वांनाच मोठा धक्का बसला. काही वेळ गावात भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी संजनाची चौकशी केली असता, त्या घरगुती कारणामुळे घर सोडून तासगाव आणि बारामती येथे गेल्याचे त्यांनी सांगितले.
मग नदीत सापडलेली मृत महिला कोण?
या घटनेनंतर, मृत महिलेची खरी ओळख शोधणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले आहे. जयसिंगपूर आणि मिरज पोलिसांनी याबाबत तपास सुरु केला असून, मृत महिलेची ओळख पटवण्यासोबतच संजना ठाणेकर या बेपत्ता असताना कुठे आणि का गेल्या होत्या, याचा शोध घेतला जात आहे. या सर्व प्रकारामुळे जरी ठाणेकर कुटुंबीय आनंदी झाले असले, तरीही मृत अनोळखी महिलेला न्याय मिळावा, अशी मागणी आता गावकऱ्यांकडून होत आहे. या संपूर्ण प्रकारामुळे सध्या गावात प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.