इंडिगोच्या विमानात एका मुस्लिम प्रवाशाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरतोय. ज्यामध्ये एका व्यक्तीने मुस्लिम प्रवाशाच्या चेहऱ्यावर थप्पड मारल्याचे स्पष्ट दिसतंय. ही घटना विमान उड्डाणाच्या वेळी घडल्याचा दावा केला जातोय. या प्रकरणाने प्रवाशांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून सोशल मीडियावर याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
काय आहे नेमकी घटना?
व्हायरल व्हिडिओनुसार, विमानातील केबिन क्रू एका मुस्लिम प्रवाशाला त्याच्या जागेवर बसवण्यासाठी त्याचा हात धरून नेत होते. याचवेळी अचानक एका व्यक्तीने त्या प्रवाशाच्या चेहऱ्यावर जोरदार थप्पड मारली. या घटनेने विमानात एकच गोंधळ उडाला. केबिन क्रूने तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. क्रू मेंबर्स सतत, “कृपया त्याला मारू नका… शांत राहा,” असे सांगत होते. असे असले तरी फ्लाइटमध्ये काही काळ तणावपूर्ण वातावरण कायम राहिले. व्हिडिओमध्ये पुढे दिसते की, “तू त्याला का मारले?” असे मारहाण करणाऱ्याला दुसऱ्या प्रवाशाने विचारले. यावर त्यच्याकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही. मारहाण झालेल्या प्रवाशाच्या चेहऱ्यावर दुखः आणि भीतीचे भाव स्पष्ट दिसत होते. मारहाण झालेल्या व्यक्तीला केबिन क्रूने पाणी देऊन शांत करण्याचा प्रयत्न केला.