मालाडमधील अंडीविक्रेत्याने दिलेल्या तक्रारीनुसार, त्याचा मुलगा तिसरीत शिकत असून खासगी शिकवणीसाठी याच परिसरातील राजश्री यांच्या घरी जातो. त्यांची मोठी मुलगी मुलास घेऊन जाते आणि पुन्हा घेऊन येते.
२८ जुलै रोजी राजश्री यांनी फोन करून तुमच्या मुलाचा अभ्यास झाला असून त्याला घेऊन जा, असे सांगितले. त्यानुसार त्यांची मुलगी आणायला गेली असता, लहान भाऊ रडत असल्याचे तिने पाहिले. याबाबत राजश्री यांना विचारले असता, त्याला अभ्यासाचा कंटाळा असल्याने रडण्याचे नाटक करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
वारंवार सांगूनही हस्ताक्षर चांगले काढत नसल्याने या शिक्षिकेने आठ वर्षीय मुलाच्या हातावर मेणबत्तीने चटके दिल्याचा प्रकार उघडकीस आला. उजव्या हाताला चटके आणि डाव्या हातावर मारहाण करणाऱ्या खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेवर कुरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरी आल्यावर मुलीने सर्व प्रकार पालकांना सांगितला. मुलाला याबाबत विचारले असता त्याने हात पुढे केले. हस्ताक्षर चांगले येत नसल्याने शिक्षिकेने मेणबत्ती पेटवली आणि उजव्या हातावर चटके दिले, असे त्याने सांगितले. डाव्या हातावरही मारहाणीचे वळ दिसले.