पायी वारी करीत पंढरपूरला जाण्याइतपत वेळ आणि शारीरिक श्रम करणे शक्य न झालेल्या जिल्ह्यातील सव्वालाखांहून अधिक भाविकांना राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाने विठूरायाचे दर्शन घडविले. आषाढी यात्रा काळात १ लाख ३४ हजार भाविकांना एसटीने पंढरपूरची वारी घडविली असून, यातून महामंडळाला ३ कोटी ३० लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.
विशेष म्हणजे, अन्य प्रवाशांच्या तुलनेत ७५ वर्षांवरील सर्वाधिक ४२ हजार १५८ प्रवाशांना ‘अमृत’ योजनेच्या माध्यमातून मोफत प्रवासाचा लाभमिळाला आहे. पंढरपूरमध्ये विटेवर उभा असलेला श्रीरंग हे संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत आहे. वर्षातून किमान एकदा तरी विठूरायाच्या चरणी लीन व्हावे अशी प्रत्येक भाविकाची श्रद्धा असते. हजारो वारकरी पायी वारी करून आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला दर्शनासाठी जात असतात. परंतु, इच्छा असूनही अनेकांना ही पायी वारी शक्य होत नाही.
अशा भाविकांकरिता राज्य मार्ग परिवहन महामंडळ दरवर्षी विशेष बससेवा पुरविते. एका गावातून ५० हून अधिक भाविक पंढरपूरला जाणार असल्यास थेट गावातून बस उपलब्ध करून दिली जाते. याशिवाय प्रवाशांचा ओघ अधिक असल्यास वेगवेगळ्या आगारांमधून जादा बसेस उपलब्ध करून दिल्या जातात.
आगारनिहाय प्रवासी वाहतूक
आगार –प्रवासी संख्या
सिन्नर —१८,२४७
कळवण —१६,०९२
मालेगाव —१३,४६५
सटाणा —१२,६७५
नाशिक १ —२,१२,३५१
नाशिक २ — १.१०,७१०
मनमाड —१०,४८४
इगतपुरी —८,२४३
नांदगाव —८,०१२
येवला —६.७२७
लासलगाव —६.०३२
पेठ —६,०२९
पिंपळगाव बसवंत —४,९३०
एकूण —१,३३,९९७
