गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सार्वजनिक मंडळांमध्ये तर गणेशोत्सवासाठी लगबग सुरु झाली असून, मूर्तीकारही गणेशमूर्ती तयार करण्यात व्यग्र आहेत. तसंच घरच्या गणपतीची मूर्ती निवडण्यासाठी बाजारांमध्ये नागरिकांची लगबग सुरु झाली आहे. यादरम्यान गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी आली आहे. गणेशोत्सव महाराष्ट्राचा उत्सव म्हणून घोषित केला आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत ही घोषणा केली आहे.
भाजपाचे कसबा पेठचे आमदार नारायण रासने यांनी गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यात यावा अशी मागणी केली. त्यावर उत्तर देताना आशिष शेलार यांनी रासने यांचे आभार मानले. पुढे ते म्हणाले, “महाराष्ट्राचा गणेशोत्सव 1893 रोजी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिकरित्या सुरु केला. घऱोघरी तो सुरु होताच. त्याची एक पार्श्वभूमी सामाजिक, राष्ट्रीय, स्वतंत्रता, स्वाभिमान, स्वभाषा या सगळ्यांशी संबंधित होतं आणि त्याच पद्धतीन चालू आहे. त्यामुळेच महाराष्ट्राचा गौरव आणि अभिमान असलेला गणेशोत्सव महाराष्ट्र राज्याचा महोत्सव उत्सव म्हणून घोषित करेल हे मी आजच स्पष्ट करतो”.
आपल्या गणेशोत्सवाच्या बाबतीत महायूती सरकारने भूमिका घेतली असून पोलीस सुरक्षा असेल, आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चरवरचा खर्च असेल, कसबामध्ये आणि विशेषता पुण्यातला महोत्सव असेल मुंबईतला असेल, पूर्ण राज्यातला असेल त्यासाठी लागतील तेवढा निधी राज्य सरकार खर्च करेल. कारण गणेशोत्सव उत्साहाने साजरा करणे ही महायुतीची आणि या शासनाची भूमिका आहे. सर्व गणेशोत्सव मंडळांना यानिमित्ताने माझी विनंती आहे की आपण जे वेगवेगळे देखावे करतात त्यामध्ये आपले सैन्य,सैनिक, सामाजिक उपक्रम, ऑपरेशन सिंदूर, देशांतर्गत विकासाची कामे, आपले महापुरुष अशा सगळ्या गोष्टींच्या विचार करावा. सामाजिक भान, पर्यावरणपूरक आणि उत्साहात साजरा होणारा हा गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून घोषित करताना आम्हाला आनंद होतो आहे, असे निवेदन त्यांनी केले.
