पुण्यातील एका आईला चिमुकलीला एकटं घरात बंद करुन बाहेर जाणं महागात पडलं. पुण्यातील एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पुण्यातील गुजर निंबाळकरवाडी परिसरातील सोनवणे बिल्डींगमधे राहणाऱ्या चांदणे या महिलेने आपल्या चार वर्षांच्या चिमुकलीला घरात एकटं बंद करु ठेवलं होतं. झालं असं की, मोठ्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी आई निघाली पण तिने तिच्या चार वर्षांच्या मुलीला घरात कुलूप लावून बंद केलं होतं. या चिमुकलीचं भाविका असून आई आणि घरात कोणी नाही हे पाहता तिने प्रताप केला. घरातील खिडकीकडे ही मुलगी गेली आणि तिने ग्रीलमधून डोक बाहेर काढलं. धक्कादायक म्हणजे हा प्रताप करताना ती मुलगी खिडकीतून घराबाहेर गेली. हे घर इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर होतं. त्यामुळे तिलाही लक्षात आलं आपण काहीतरी धोकादायक केलं आहे. तिने खिडकीचे लोखंडी ग्रील चिमुकल्या हाताने पकडून ठेवलं.
असा वाचला चिमुकलीचा जीव!
ती चिमुकली रडत असल्याने इमारतीमधील काही लोकांचं लक्ष तिच्याकडे गेलं आणि एकच धावाधाव सुरु झाली. अशातच इमारतीमध्ये राहणाऱ्या अग्नीशमन दलातील योगेश चव्हाण यांच्या कानावर ही बातमी पोहोचली. ते अग्नीशमन दलात तांडेल म्हणून काम करतात. घटनेच्या दिवशी त्याचा वीक ऑफ असल्याने त्यांनी मदतीसाठी धाव घेतली. पण घराला कुलूप असल्याने ते हितबल झाले. त्यांनी लगेचच मुलीच्या आईकडे धाव घेतली आणि त्यांच्याकडून घराची चावी घेऊन परत तिसऱ्या मजल्यावरील घराकडे आले. घराचा दरवाजा उघडून ते खिडकीकडे गेले आणि त्यांनी भाविकाला शांतपणे हळूच परत त्या लोखंडी खिडकीच्या ग्रीलमधून आत घेतले आणि अशाप्रकारे तिचा जीव वाचविला. भाविकाची सुखरुप सुटका झाल्यामुळे सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.
