बैल विकले पण पैसे दिले नाहीत, निर्दयी मुलाची वडिलांना बेदम माराहण; रागातून निर्घृण हत्या

बार्शी तालुक्यातील वाणेवाडी गावात पैशाच्या कारणावरून झालेल्या वादातून मुलानेच वडिलांची निघृण हत्या केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. रावण सोपान खुरंगुळे (वय ७०) असं हत्या झालेल्या वडिलांचं नाव आहे. मुलगा अनंतराव ऊर्फ अनिल रावण खुरंगुळे याने काठी आणि पोतराजाच्या चाबकाने मारहाण करुन वडिलांची हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मारहाणीदरम्यान झालेल्या जखमांमधून घरात रक्ताचा पाट वाहिला. या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडिलांनी बैल विकले, पण त्यातून आलेले पैसे दिले नसल्याचा राग मनात धरुन मुलाने बापाची निघृण हत्या केली. याप्रकरणी संशयित मुलगा आरोपी अनिल खुरंगुळे याला बार्शी ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

झोपेतून उठवून केली निघृण हत्या

पिता रावण खुरंगुळे हे घरी झोपले होते. यादरम्यान संशयित आरोपी मुलगा अनंतराव ऊर्फ अनिल रावण खुरंगुळे हा तिथे आला. त्याने वडिलांना झोपेतून उठवत बैल विकल्याचे पैसे न दिल्यासंबंधी विचारणा करायला सुरुवात केली. पुढच्या काही वेळातच पैशाच्या कारणावरुन काठी आणि पोतराजाचा चाबूक याने संशयित अनंतराव ऊर्फ अनिल याने वडील रावण खुरंगुळे यांना जबरी फटके मारले. त्यातच ते बेशुध्दावस्थेत गेले आणि वृद्ध रावण खुरंगुळे त्यांचा मृत्यू झाला.

बैल विकल्याचे पैसे दिले नाही म्हणून मीच त्याला मारले

वाणेवाडी गावचे पोलीस पाटील लोखंडे (वय ३३, रा. वाणेवाडी) यांनी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक ६ जुलै २०२५ रोजी सकाळी ७.१५ वाजता गावातील नागरिकांकडून माहिती मिळाली की, रावण खुरंगुळे हे घराबाहेर बेशुद्ध अवस्थेत पडले आहेत.

घराचा एक दरवाजा बंद तर दुसरा उपडा होता. घराच्या खोलीत रक्त पडलं होतं. दरम्यान, घरात झोपलेल्या अनंतरावला नागरिकांनी जाग केल्यानंतर तो म्हणाला मरु दे, काल त्याने बैल विकले, पण पैसे दिले नाहीत, म्हणून मीच त्याला काठीने आणि पोतराजाच्या चाबकाने मारलं. पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *