लेकानं पसंत नसलेल्या मुलीशी लग्न केलं, बापानं वादातून विषाचा घोट प्याला, विरह सहन न झाल्याने मुलानं सुद्धा तेचं केलं; सांगलीत एकाचवेळी बापलेकाच्या शवविच्छेदनाची वेळ

सांगलीतील मिरज तालुक्यातील सोनी येथे कौटुंबिक वादातून बाप-लेकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गणेश हिंदुराव कांबळे आणि इंद्रजीत गणेश कांबळे अशी त्यांची नावे आहेत. लग्नावरून सुरु झालेल्या वादात बाप लेकाचा दुर्दैवी शेवट झाला असून ज्या घरात महिन्यापूर्वी लग्न पार पडलं त्याच घरात दोघांचा जीव गेलेला पाहण्याची वेळ कुटुंबावर आली. अवघ्या कुटुंबाचा डोलारा या घटनेनंतर कोसळला आहे.

पसंत नसलेल्या मुलीशी विवाह झाल्याने दोघांमध्ये वाद

मिळालेल्या माहितीनुसार इंद्रजीतचा गेल्या महिन्यात विवाह झाला होता. परंतु पसंत नसलेल्या मुलीशी विवाह झाल्याने इंद्रजीत आणि त्याचे वडील गणेश यांच्यामध्ये वाद सुरू होता. वाद विकोपाला गेल्याने गणेश यांनी सकाळी शेतात जात विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका आल्यानंतर वडिलांच्या आत्महत्येचा विरह सहन न झाल्याने इंद्रजीतने देखील विषारी द्रव प्राशन केले. विषारी द्रव प्राशन केल्यामुळे दोघांचाही मृत्यू झाला. बापलेकावर एकाच वेळी मिरज शासकीय रुग्णालयात विच्छेदन करण्यात आले. या घटनेमुळे सोनी गावावर शोककळा पसरली आहे.

शेतात जाऊन विषप्राशन

आज (4 जूलै) पहाटेच्या सुमारास गणेश कांबळे हे नेहमीप्रमाणे आपल्या शेताकडे गेले होते. यावेळी त्यांनी शेतामध्येच विष प्राशन केले. शेतात ते बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे दिसल्याने इतर शेतकऱ्यांनी तातडीने त्यांच्या कुटुंबियांना माहिती दिली. गावातील रुग्णवाहिका घेऊन मुलगा इंद्रजित व नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. गणेश कांबळे यांना उपचारासाठी रुग्णवाहिकेतून घेवून जात असताना, अचानक इंद्रजितनेही मागे जात कीटकनाशक प्राशन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *