‘तुम्ही कुठे कलेक्टर झालात?’, मार्क्स कमी मिळाल्याने जाब विचारणाऱ्या वडिलांना मुलीचं उत्तर; संतापलेल्या बापाने रात्रभर….; ठोकल्या बेड्या

सांगलीमधील आटपाडीत बापानेच पोटच्या लेकीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षेत कमी गुण मिळाल्याचा जाब विचारल्यानंतर मुलीने दिलेलं उलट उत्तर ऐकून संतापलेल्या बापाने इतकी मारहाण केली की मुलीला जीव गमवावा लागला. साधना धोंडीराम भोसले असं मृत मुलीचं नाव आहे. तिच्या आईने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर आरोपी पित्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

साधनाला खासगी शिकवणीच्या बारावीच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाले होते. यामुळे धोंडीराम भोसले संतापले होते. मुलीला डॉक्टर करण्याचं त्यांचं स्वप्न होतं. यासाठीच तिला खासगी शिकवणी लावण्यात आली होती. दहावीत तिने 92.60 टक्के गुण मिळवले होते. गावातील शाळेत पहिला क्रमांक पटकावणाऱ्या मुलीकडून धोंडीराम भोसले यांना फार अपेक्षा होत्या. यामुळे तिला वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याचे प्रयत्न सुरु होते. पण बारावीच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने त्यांना डॉक्टर होण्याचं स्वप्न पुसट होताना दिसू लागलं.

धोंडीराम भोसले नेलकरंजी येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षत असून, पत्नी प्रिती गावच्या माजी सरपंच आहेत. धोंडीराम यांनी शुक्रवारी घरी आल्यानंतर मुलगी साधनाला कमी गुण मिळाल्याचं कारण विचारलं. मी तुझ्यासाठी इतका खर्च करतोय? तू कशी डॉक्टर होणार? असा जाब त्यांनी विचारला. यादरम्यान साधनानेही त्यांना उलट उत्तर देत, ‘पप्पा तुम्हालाही कमीच गुण मिळाले होते. तुम्ही कुठे कलेक्टर झालात? शिक्षकच झालात’ असं म्हटलं. मुलीने उलट उत्तर दिल्याने धोंडीराम चिडले आणि दगडी जात्याच्या लाकडी खुंट्याने बेदम मारहाण केली.

धोंडीराम यांनी मुलीच्या पोटात लाथाही घातल्या. पत्नीने मध्यस्थी केल्यानंतर अखेर ते थांबले होते. पण काही वेळाने त्यांनी पुन्हा एकदा साधनाला मारहाण केली. या मारहाणीत तिच्या गंभीर इजा झाल्या होत्या. घरात बेशुद्ध पडली असता तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बाथरुममध्ये पडून जखमी झाल्याचं सांगत डॉक्टरांची दिशाभूल कऱण्याचा प्रयत्न झाला. पण दुर्दैवाने उपचार मिळण्याआधीच तिने जीव गमावला.

डॉक्टरांना मुलीच्या शरिरावर जखमांच्या खुणा आढळल्याने पोलिसांना कळवण्यात आलं. पोलिसांनी चौकशी केली असता घटना उघडकीस आली. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. साधनाची आई प्रिती यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर धोंडीराम भोसलेंना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना 24 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *