सोशल मीडियावरील रील्स स्टार असलेल्या महिलेने प्रियकराची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार Pune Crime उघडकीस आला आहे. प्रेमसंबंधातील वादाने टोक गाठल्यामुळे मावळ तालुक्यातील इंदोरी गावात हे धक्कादायक हत्याकांड घडल्याची माहिती आहे. पोलिसांनी संशयित महिला संध्या पवार हिला ताब्यात घेत अधिक तपास सुरु केला आहे.
30 वर्षीय महिलेने प्रेमसंबंधातून झालेल्या भांडणातून तरुणाचे हातपाय बांधले. त्यानंतर क्रिकेटच्या बॅटने अमानुष मारहाण करत त्याचा खून केला. ही घटना 12 जून 2025 रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
कमल रामदयाल मधुकर, वय 30 वर्ष, मूळ रा. छत्तीसगड, असे मृत तरुणाचे नाव असून या प्रकरणी कमलच्या बहिणीने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरुन संध्या पवारच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी तिला अटक केली आहे.
नेमकं काय घडलं?
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमल आणि संध्या पवार हिचे गेल्या काही दिवसांपासून प्रेम संबंध होते. कमल गुरुवार 12 जून रोजी रात्री त्या महिलेच्या घरी गेला असता दोघांमध्ये प्रेमसंबंधावरून जोरदार वाद झाला. वाद टोकाला गेल्याने संतप्त झालेल्या महिलेने कमलचे हातपाय बांधले आणि क्रिकेटच्या बॅटने त्याला बेदम मारहाण केली.
इंदोरी गावात खळबळ
या मारहाणीत कमल गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच तो मृत झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. या घटनेने इंदोरी गावात खळबळ उडाली आहे. प्रेमसंबंधातील मतभेद इतक्या क्रूर कृत्यापर्यंत जाऊ शकतात, यावर विश्वास बसत नसल्याचे गावकरी सांगत आहेत.
महिला ताब्यात, अधिक तपास सुरु
पोलिसांनी संध्या पवारला ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करत असून, पुढील खुलासे लवकरच समोर येण्याची शक्यता आहे. या घटनेने मावळ तालुका पुन्हा एकदा हादरला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.