सूनबाईंनी नवरा गमावला, राऊत बोलताच घोसाळकरांचे डोळे पाणावले; शिंदे-भाजपला लाजा वाटल्या पाहिजेत, यांच्या घरात ते…

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी काही काळापूर्वी पक्षातील नेत्यांबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर त्यांना भाजप प्रवेशाच्या ऑफर आल्या होत्या. त्यावरुन ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी चांगलीच आगपाखड केली आहे. तेजस्वी यांचे सासरे आणि ठाकरेसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांनी आज सकाळी संजय राऊत यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेवेळीही ते राऊतांच्या शेजारी उभे राहिले होते. पत्रकारांनी यावरुन प्रश्न विचारले असता संजय राऊत यांचा संताप झाला.

पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर विनोद घोसाळकर यांनी ‘आम्ही अजून शिवसेनेत आहोत’ असं उत्तर दिलं. त्यावर संजय राऊत पुढे म्हणाले, की ‘आताच आम्हा दोघांची चर्चा झाली. विनोद घोसाळकर हे शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसैनिक आणि आता उपनेते आहेत. त्यांच्या घरात, त्यांच्या मुलासोबत दुर्दैवी प्रसंग घडला’ असं राऊत म्हणताच घोसाळकरांच्या डोळ्यात टचकन आलेलं पाणी कुणाच्याही नजरेतून लपलं नाही.

राऊत पुढे म्हणाले की ‘विनोद घोसाळकर यांच्या सूनबाई तेजस्वी घोसाळकर शिवसेनेच्या नगरसेविका होत्या. खरं तर मला लाज वाटते, भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाची. याही परिस्थितीत त्या दोन पक्षांचे प्रमुख नेते त्या मुलीला फोन करुन. आमच्या पक्षात या… आमच्या पक्षात या… असं म्हणतात. त्यांना लाज वाटली पाहिजे. जिने आपला पती गमावला, ज्यांनी आपला मुलगा गमावला… अशा घरामध्ये तुम्ही अशी कृत्यं करताय.. लाजा वाटल्या पाहिजेत, हे निर्दयी लोक आहेत. निर्घृण लोक आहेत. आमचा विषय आम्ही बघू.. ते पक्षात आहेत, आमच्या सोबत आहेत. त्यांची सूनबाईही पक्षात आहेत’ असं संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं

तेजस्वी घोसाळकर यांनी स्थानिक नेतृत्वावरील नाराजीतून मे महिन्यात सर्व पदांचा राजीनामा दिला होता. त्यानंतर तेजस्वींना तात्काळ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेटीसाठी ‘मातोश्री’वर बोलावलं होतं. या भेटीत तेजस्वी घोसाळकर यांची नाराजी दूर झाली. मी सदैव ठाकरेंसोबत असल्याचं तेजस्वी घोसाळकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *