पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात ‘सैतान’ आणि ‘क्रूर’ असे शब्द वापरणाऱ्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीनचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. किशनगंजचे पोलिस अधीक्षक राजीव राजन यांनी हे आदेश दिले आहेत.
एका सभेला संबोधित करताना अकबरुद्दीन ओवेसी यांनी आक्षेपार्ह भाषेचा वापर केला होता. याप्रकरणी एका अधिकाऱ्याने किशनगंज पोलिस स्टेशनमध्ये एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसे यांचे धाकटे बंधू अकबरुद्दीन ओवेसी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.
बिहारच्या निवडणूक प्रचारातील सभेला संबोधित करताना अकबरुद्दीन ओवेसे यांच्यावर तिखट शब्दात टीका केली होती. गुजरात दंगलीला जबाबदार असणारे नरेंद्र मोदी ‘सैतान’ आणि ‘क्रूर’ आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य अकबरुद्दीन ओवेसींनी केलं होतं.
गुजरातमधील दंगलीत मुसलमानांना चोहोबाजूंनी घेरुन मारलं जात होतं. या दंगलींसाठी मोदीच जबाबदार आहेत असा आरोपही त्यांनी केला. दंगलीतील दोषींच्या हातात बेड्या असत्या तर काँग्रेस मुसलमानांच्या बाबतीत गंभीर्याने विचार करत असल्याचं स्पष्ट झालं असतं, असं ओवेसी म्हणाले होते.
