पैशांसाठी काहीजण कुठल्याही स्तराला जातात, इतकेच काय तर नातेगोते ही तोडत असतात. मात्र अशा काळात काही व्यक्तींमध्ये असलेला प्रामाणिकपणा जीवंत असल्याचे आपल्याला दिसून येते. अशाच प्रामाणिकपणाचे दर्शन अमिन शेख या भंगारवाल्यामुळे घडले. शिक्षकांच्या घरातून दिलेल्या भंगारात अनवधानाने १० लाखाचे सोने दिले गेले. मात्र ते कळताच भंगारवाल्याने मूळ मालकाला ते परत केले. विशेष म्हणजे गुरुच्या पत्नीचे सोने अत्यंत हालाखीची परिस्थिती असलेल्या विद्यार्थ्याने परत केल्याने गुरु सुखावले. अमीन शेख या भंगारवाल्याचे प्रामाणिकपणामुळे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
शहादा शहरातील शिक्षक असलेले संजय राजपूत यांच्या पत्नीचे काही महिन्यांपूर्वी मोठे ऑपरेशन झाले. ऑपरेशन नंतर त्या सुखरूप वाचल्यानंतर मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांच्या पत्नीने सोन्याची पोत तसेच बांगड्या असा सुमारे साडेनऊ तोळ्यापेक्षा अधिकचे दागिने अंगावर घातले. वाढदिवस साजरा करून आल्यानंतर त्यांनी ते कपाटाजवळ ठेवले. त्याचठिकाणी भंगारात देणारे साहित्य ठेवले होते. संजय राजपूत यांचा मुलगा भूषण राजपूत याच्याने अनवधानाने ते सोने त्या भंगारात दिले गेल्याची घटना ८ जूनला सकाळी १०.३० च्या सुमारास घडली. ९ जून ला त्यांना नंदुरबार येथे जायचे असल्याने सोने पाहिले असता ते दिसून आले नाही. त्यामुळे त्यांच्या लक्षात आल्या नंतर त्यांनी अमीन शेख यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर अमीन शेख यांनी साडेनऊ तोळे सोने मूळ मालकाला परत केले. निवृत्त शिक्षक संजय राजपूत यांचा अमीन शेख हा विद्यार्थी होता.