गुगल मॅपमुळे पत्ता शोधणं खरंच सोपं झालं आहे. तुम्ही एखाद्या अज्ञात ठिकाणी फिरत असाल, तिथली भाषा येत नसेल आणि कोणाशी संपर्कही साधता येत नसेल तरीही गुगल मॅपच्या मदतीनं हवं ते ठिकाण सहज सापडू शकतं.
पण गंमत म्हणजे हे गुगल मॅप पाश्चात्य देशांत जवळपास १०० टक्के अचूकतेनं काम करतं. मात्र भारतात काही वेळा पत्ता शोधणं गुगललाही जमत नाही. आणि अशा वेळी तो चुकीचा मार्ग दाखवतो.
हो, असंच एक प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. गुगल मॅप फॉलो करत एक चालक थेट अर्धवट बांधलेल्या ब्रीजवर गेला आणि त्याची गाडी थेट खाली कोसळली! हा व्हिडीओ पाहून खरंच तुम्ही सुद्धा अचंबित झाल्याशिवाय राहणार नाही.
ही घटना उत्तर प्रदेशमधील महाराजगंज येथे घडली आहे. एक कार चालक गुगल मॅपच्या मदतीनं पत्ता शोधत होता. दरम्यान, ऑनलाईन मॅप फॉलो करत तो एका ब्रिजवर गाडी पळवू लागला. पण काय सांगावं, तो फ्लायओव्हर अर्धवट बांधलेला होता, म्हणजे अजून पूर्ण व्हायचा बाकी होता. त्यामुळे ही कार थेट ब्रिजवरून खाली पडली.
गंमत म्हणजे, कोसळलेली कार सरळ एका पिलरवर जाऊन अडकली आणि हवेत लटकली. अखेर या कारला जमिनीवर उतरवण्यासाठी जेसीबी बोलवावा लागला. चालकानं गुगल मॅपवर जरा जास्तच विश्वास ठेवला, आणि त्याचा परिणाम म्हणजे हा थरारक अपघात.
गुगल मॅप कधी कधी जुनी माहिती दाखवतो, कारण रस्त्यांचे अपडेट लगेच होत नाहीत.
तुमचं नेटवर्क किंवा GPS सिग्नल कमजोर असेल, तर मॅप चुकीचा मार्ग दाखवण्याची शक्यता वाढते.
जर तुम्ही मॅपमध्ये अचूक लोकेशन टाकलं नाही, तर तो अंदाजानं रस्ता सुचवतो. त्यामुळे नेमकं ठिकाण शोधायचं असेल, तर पूर्ण आणि अचूक पत्ता भरा.
अनेकांनी यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या असून, काहींनी तर या कार चालकाची फिरकी सुद्धा घेतली आहे. कोणी म्हणतेय की, चालकानं पूर्णपणे गुगल मॅपवर अवलंबून न राहता आसपास चौकशी केली असती, तर अपघात टळला असता.
