चिठ्ठीत पासवर्ड लिहिला अन् निवासी डॉक्टरने आयुष्याची दोर कापली; पुण्याच्या वसतिगृहातील धक्कादायक घटना

 रुबी हॉल क्लिनिकमध्ये रेडिओलॉजी विभागात कार्यरत असलेल्या युवा निवासी डॉक्टर श्याम व्होरा (वय २८) ने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली आहे. ढोले पाटील रस्त्यावरील डॉक्टरांच्या हॉस्टेलमध्ये त्याने जीवन संपवलं. सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकरांच्या आत्महत्येनंतर सारेच हादरले होते. त्यानंतर काही दिवसांत सोलापुरातील एका शिकाऊ डॉक्टरानेही वसतीगृहात हात व गळा चिरुन आत्महत्या केली. त्यानंतर पुण्यातून ही धक्कादायक बातमी समोर आली आहे.

डॉ. व्होरा हा गुजरातमधील भावनगरचा रहिवासी आहे. गेल्या एक वर्षापासून तो पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये रेडिओलॉजी डायग्नोसिस विभागात निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत होता. दामोदर भवन या इमारतीमध्ये रुबी हॉलच्या डॉक्टरांसाठी वसतिगृह आहे. यामध्ये ८० ते १०० डॉक्टरांची राहण्याची सोय करण्यात आलेली आहे. डॉ. व्होरा याच इमारतीत इतर डॉक्टरांबरोबर राहत होता.

रविवारी रात्री श्यामची खोली बराच वेळ बंद राहिल्याने संशय निर्माण झाला होती. सहकाऱ्यांनी अनेकवेळा बेल वाजवून देखील प्रतिसाद न मिळाल्याने सुरक्षा रक्षकांनी दरवाजा तोडून खोलीत प्रवेश केला. त्यावेळी श्यामने ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे आढळून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *