भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठे रेल नेटवर्क आहे. रेल्वेच्या माध्यमातून दररोज 24 मिलियन प्रवासी प्रवास करतात. याचाच अर्थ म्हणजेच दररोज 6.905 बिलियन प्रवासी भारतीय रेल्वेतून प्रवास करतात. सर्वसामान्यांसाठी रेल्वे ही जीवनवाहिनी आहे. रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांसाठी एक खुशखबरी आहे. रेल्वेचा प्रवास आणखी सुविधाजनक बनवण्यासाठी इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिजम कॉर्पोरेशन (IRCTC) एक सुविधा घेऊन आली आहे. या माध्यमातून तिकीट बुकिंग, लाइव्ह ट्रेन ट्रॅकिंग, जेवण ऑर्डर करणे आणखी सोप्पं झालं आहे.
रेल्वे प्रवाशांना अधिक सुविधा देण्यासाठी, आयआरसीटीसीने स्वारेल (SwaRail) नावाचे एक नवीन मोबाइल अॅप्लिकेशन लाँच केले आहे. ज्याचा वापर करून, प्रवाशांना तिकीट बुकिंग प्रक्रिया आणि तक्रार व्यवस्थापन यासारख्या सेवा पुरवल्या जातील. अॅपच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, स्वारेलमध्ये केवळ तिकीट बुकिंगच नाही तर यापेक्षा खूप जास्त फिचर आहेत. या अॅपद्वारे, तुम्ही काही मिनिटांत तिकीट बुकिंग करू शकता, लाईव्ह ट्रेन ट्रॅकिंग तपासू शकता आणि येथून तुम्ही प्लॅटफॉर्म तिकिटे देखील बुक करू शकता, पीएनआर स्थिती आणि कोच स्थिती तपासू शकता.
बऱ्याचदा रेल्वे प्रशासनाकडून ट्रेन रद्द करण्यात येते किंवा काही कारणास्तव तुम्हाला तुमचे तिकीट बुकिंग रद्द करावे लागते. अशा परिस्थितीत, रद्द केलेल्या किंवा ट्रेन सुटली असल्यास तुम्ही परतफेड करु शकता. अशा परिस्थितीत, तुम्ही नवीन सुविधेद्वारे रेल्वे तिकिटांच्या रिफंडसाठी रिक्वेस्ट करु शकता. एवढेच नाही तर तुम्ही तक्रारदेखील नोंदवू शकता किंवा अभिप्राय देखील देऊ शकता.
हे अॅप सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्स (CRIS) ने विकसित केले आहे. स्वारेल सध्या अर्ली अॅक्सेसमध्ये असून यात सर्व फिचर आधीच उपलब्ध आहेत. तसंच आणखी सुधारणा लवकरच करण्यात येणार आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला ट्रेन तिकीट बुकिंग, फूड ऑर्डरिंग, प्लॅटफॉर्म तिकीट बुकिंगची सुविधा हवी असेल तर हे अॅप तुमच्यासाठी नक्कीच खूप उपयुक्त ठरेल.
भारतातील रेल्वे प्रवासाचे डिजिटलायझेशन आणि आधुनिकीकरण करण्याच्या आयआरसीटीसीच्या मिशनमधील स्वारेल हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. या अॅपद्वारे प्रवाशांना सोप्पा इंटरफेस, सोपे नेव्हिगेशन आणि सोपे तिकीट बुकिंग, आरक्षण सुविधा देण्यात येणार आहे. ऑनलाइन सुविधांसोबतच, भारतीय रेल्वे ऑफलाइन सुविधा देखील सुधारण्याचा प्रयत्न करत आहे.