अमेरिकन डॉलरच्या ऐवजी कोर्‍या कागदांचे बंडल; फसवणूक करणार्‍याला जेजूरीतून अटक

भारतीय चलनाच्या मोबदल्यात अमेरिकन डॉलर देतो असे सांगून एका कंपनीच्या लेखापालाने ५६ लाख ३४ हजार रुपये ऑनलाईन घेतले. परंतु मोबदल्यात ६५ हजार अमेरिकन डॉलरच्या नावाने कोर्‍या कागदांची दोन बंडले देऊन तो शिताफिने पसार झाला. पोलीस आपल्याला पकडणार हे ठाऊक असतानाही त्याने लपून राहण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. अखेर नागपाडा पोलिसांनी त्याला जेजुरी येथून अटक केले.

समीर कांबळे असे आरोपीचे नाव असून तो एका टूर्स अ‍ॅन्ड ट्रव्हल्स प्रा.लि. कंपनीत लेखापाल म्हणून काम करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास नावाचा दलाल विविध कंपन्यांना भारतीय चलनाच्या मोबदल्यात परदेशी चलन मिळवून देण्याचे काम करतो. दरम्यान, समीर कांबळे याच्याकडे अमेरिकन डॉलर उपलब्ध असल्याची माहिती कैलासने चार कंपन्यांना दिली होती. त्या कंपन्यांना देखील अमेरिकन डॉलर हवे असल्याने त्यांनी समीर काम करत असलेल्या टूर्स अ‍ॅन्ड ट्रव्हल्स प्रा. लि. कंपनीच्या खात्यात एकूण ५६ लाख ३४ हजार रुपये पाठविले होते.

त्यानंतर या पैशांच्या मोबदल्यात समीर कांबळे याने ६५ हजार अमेरिक डॉलर दोन वेगवेगळ्या बंडलात कैलासला दिले. त्यानंतर कैलासने परदेशी चलन मुंबई सेंट्रल येथे पटनाकर इंटरप्रायझेज कंपनीच्या कार्यालयात जाऊन नईम सय्यद यांच्याकडे दिले व तुम्ही ते डॉलर वाटून घ्या असे सांगितले. नईम यांनी ते दोन्ही लिफाफे उघडून पैसे पाहिले असता त्यांना धक्काच बसला. कारण बंडलच्या वर आणि खाली फक्त अमेरिकन डॉलर होते. तर आतमध्ये त्या नोटांच्या आकाराचे कोरे कागद होते. हा प्रकार लक्षात येताच कैलास यांनी समीर कांबळेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याच्या घरी जाऊन शोध घेतला. परंतू समीर पसार झाला होता. त्यामुळे फसवणूक झाल्याप्रकरणी नईम यांनी दिलेल्या तक्रारीवरून नागपाडा पोलीस ठाण्यात समीर कांबळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी समीरचा तांत्रिक पद्धतीने शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतू तो लपून राहात होता. अखेर तो जेजूरी येथे लपला असल्याची माहिती मिळताच नागपाडा पोलिसांच्या पथकाने तेथे जाऊन समीर कांबळे याला पकडले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी दिली. आरोपी समीर विरोधात पूर्वी अशाप्रकारचे कुठलेही गुन्हे दाखल नसल्याचे समजते. दरम्यान याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *