पद्मश्री अशोक सराफ यांच्यासाठी खास उद्घोषणा करून त्यांना भर विमानात अभिवादन केल्यामुळे सध्या फ्लाइट कॅप्टन अदिती परांपजेवर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. अदिती परांजपे ही निवेदिता सराफ यांची भाची आहे.
अदिती परांजपे ही निवेदिता यांची बहीण डॉ. मीनल परांजपे यांची मुलगी आहे. फ्लाइट कॅप्टन अदितीने नुकतीच अशोक सराफ यांच्यासाठी विमानप्रवासादरम्यान खास उद्घोषणा करत त्यांचं कौतुक केलं. यापूर्वी देखील अदितीचा एक व्हिडीओ सर्वत्र चर्चेत आला होता. यावेळी तिने विमानातील सर्व प्रवाशांना मराठीत सूचना दिल्या होत्या. आपल्या मातृभाषेचा अशाप्रकारे सन्मान केल्यामुळे तिचं सर्वत्र कौतुक करण्यात आलं होतं.
अदितीने इयत्ता चौथीत असतानाच वैमानिक व्हायचं असं ठरवलं होतं. काहीही झालं तरी करिअर याच क्षेत्रात करायचं यावर अदिती ठाम होती. दुसरा कोणताच बॅकअप प्लॅन नव्हता. वैमानिक व्हायचंय असं आई-बाबांना देखील तिने आधीच सांगितलं होतं. अदितीचे दोन काका ( मावशी व आत्याचे पती ) पायलट होते. एक काका एअरफोर्समध्ये फायटर पायलट होते, तर तिचे दुसरे काका कोस्टगार्डमध्ये होते. यांच्यामुळेच अदितीला वैमानिक होण्याची प्रेरणा मिळाली. गोव्याला कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टरमध्ये ती पहिल्यांदा बसली, तेव्हाच एक दिवस विमान नक्की उडवणार हे अदितीने मनात पक्कं ठरवलं होतं.
अदितीने मुंबईच्या साठ्ये महाविद्यालयातून विज्ञान शाखेत बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर ‘इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन अॅण्ड एव्हिएशन सेफ्टी’मधून बी.एस्सी. एव्हिएशन कोर्स पूर्ण केला. यावेळी फिजिक्स आणि गणित या दोन विषयांचं ज्ञान तपासलं जातं. चांगले गुण मिळवणंही आवश्यक असतं असं अदितीने नमूद केलं.
बी. एस्सी. एव्हिएशन या कोर्समध्ये कमर्शिअल पायलट लायसन्स मिळवण्यासाठी आवश्यक असा अभ्यासक्रम असतो. नॅव्हिगेशन, नॅव्हिगेशन एड्सचा वापर, हवामानाचा अभ्यास, एअरक्राफ्ट्स अॅण्ड इंजिन्स आणि मुख्य म्हणजे रेग्युलेशन्स असे अनेक विषय इथे शिकायचे असतात. वैमानिक बनण्यासाठी मेडिकल फिटनेस ही दुसरी महत्त्वाची अट असते.
अदिती या मुलाखतीत म्हणाली होती, “प्रत्येक विमानाचं प्रकारांनुसार स्वतंत्र लायसन्स असतं. प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्या प्रामुख्याने बोइंग (अमेरिकन कंपनी) आणि एअरबस (फ्रेंच) या कंपन्यांची एअरक्राफ्ट्स वापरतात. तुमच्या लायसन्सवर बोइंग ७३७ लिहिलं असेल तर तेच विमान तुम्ही चालवू शकता.”
अदितीला वैमानिक होण्याच्या प्रवासात घरच्यांची देखील पहिल्यापासून साथ मिळाली. तिचे वडील डॉ. सुनील परांजपे सर्जन आहेत आणि आई डॉ. मीनल परांजपे यांना डॉक्टरेट मिळाली आहे. त्या इंग्रजी शिकवतात. केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या भारतात होणाऱ्या परीक्षांच्या त्या परीक्षक आहेत. घरात शैक्षणिक वातावरण असल्याने अदितीच्या पालकांनी ‘काहीही कर पण पदवीधर हो’ ही एकच अट तिच्यापुढे ठेवली होती.
गगनभरारीचे स्वप्न लहानपणापासून उराशी बाळगणाऱ्या आणि ते पूर्णत्त्वास नेणारी फ्लाइट कॅप्टन अदिती परांजपे आज अनेक मुलींसाठी प्रेरणास्थान आहे.