निवासी इमारतीच्या लिफ्टमधून पाळीव श्वानाला नेत असताना त्याने एकाला चावा घेतल्या प्रकरणी न्यायालयाने श्वान मालकाला दोषी ठरवलं आहे. या प्रकरणी दंडाधिकाऱ्यांनी श्वानाच्या मालकाला दोषी ठरवत चार महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. वरळी परिसरातील एका इमारतीमध्ये सात वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेच्या प्रकरणाचा निकाल बुधवारी लागला.
4 हजारांचा दंड आणि तुरुंगवास
वरळी परिसरातील निवासी इमारतीच्या लिफ्टमध्ये पाळीव श्वानाला नेत असताना त्याने लिफ्टमधील एकाला चावा घेतला. या प्रकरणी दंडाधिकाऱ्यांनी श्वानाच्या मालकाला दोषी ठरवून चार महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. घटनेनंतर सात वर्षांनी हा निर्णय देण्यात आला. 40 वर्षीय आरोपी ऋषभ पटेल याला न्यायालयाने चार हजार रुपयांचा दंडही आकारला. या घटनेमुळे तक्रारदाराला सहन कराव्या लागलेल्या त्रासाची भरपाई पैशांनी होऊ शकत नाही. तथापि, त्याला काही प्रमाणात दिलासा मिळेल, असे न्यायालयाने म्हटले.
दंडाधिकारी सुहास भोसले यांनी आरोपीला स्वेच्छेने दुखापत करणे आणि प्राण्यांच्या बाबतीत निष्काळजीपणाने वागणे या दोन आरोपांतर्गत दोषी ठरवले व चार महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.
न्यायालयाने काय म्हटलं?
“सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी त्याच्या पाळीव श्वानाला जबरदस्तीने लिफ्टमध्ये ओढताना स्पष्टपणे दिसत आहे. त्याच्या या कृतीमधून स्वतःच्या पाळीव प्राण्याबद्दल मालकाच्या मनात असलेल्या दयाळूपणाचा अभाव दिसून येतो. आरोपीने लिफ्टमध्ये तक्रारदार आणि त्याच्या मुलगाही आहे ही गोष्ट लक्षात घेतली नाही. मानवी वापरासाठी असलेल्या जागेत आरोपीने आपल्या मुक्या प्राण्याला जबरदस्तीने नेले. त्यामुळेच तक्रारदाराला कुत्रा चावल्याने दुखापत झाली,” असं निरिक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे.
पुरेशी खबरदारी घेतली नाही
“आरोपीने तक्रारदाराबरोबरच त्याच्या मुलाला आणि तक्रारदाराचा नोकर अनुज सिंग यांना गंभीर दुखापत होण्याचा धोका टाळण्यासाठी त्याच्या पाळीव कुत्र्यावर नियंत्रण मिळवण्यासंदर्भात पुरेशी खबरदारी घेतली नाही,” असंही न्यायालयाने म्हटलं आहे.
नेमकं घडलं काय?
पटेल यांच्या इमारतीत राहाणाऱ्या रमिक कीर्ती शाह यांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. हे दोघेही वरळी येथील अल्फा अपार्टमेंटच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर राहतात. शाह यांनी सांगितले की त्यांचे कुटुंब तिसऱ्या मजल्यावर राहते तर त्यांच्या पालकांचा चौथ्या मजल्यावर फ्लॅट आहे. 1 फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी 10 वाजता, शाह त्यांच्या नोकर आणि मुलासह कामावर जात होते. चौथ्या मजल्यावरून खाली उतरताच, लिफ्ट तिसऱ्या मजल्यावर थांबली, जिथे पटेल यांनी त्यांच्या कुत्र्यासह आत येण्याचा प्रयत्न केला. शाह यांनी पटेल यांना त्यांच्या मुलाला कुत्र्याची भीती वाटत असल्याने आम्हाला आधी जाऊ द्या अशी विनंती केली. परंतु पटेल यांनी ही विनंती मान्य करण्यास नकार दिला. पटेल यांनी त्यांच्या कुत्र्याला लिफ्टमध्ये ओढले. शाह यांनी आरोप केला की पटेल यांच्या कुत्र्याने त्यांच्या डाव्या हाताला चावा घेतला. ज्यामुळे त्यांना आणि त्यांच्या नोकराला उपचारासाठी रुग्णालयात जावे लागले. या घटनेनंतर शाह यांनी वरळी पोलिस ठाण्यात पटेल यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.