पेट्रोल-डिझेल दरवाढ : काँग्रेसचा बैलगाडी मोर्चा

पेट्रोल व डिझेलचे भाव कमी झाल्याने जनतेला दिलासा मिळत असतानाच राज्यातील फडणवीस सरकारने त्यावर दुष्काळ निधीच्या नावाने कर लादून सर्वसामान्य जनतेची घोर फसवणूक केली आहे. दुष्काळाच्या नावावर १६०० कोटी रुपयांची करवाढ लादून युती सरकारने जनतेची लुबाडणूक चालवली आहे.

या अन्यायकारक कराच्या विरोधात कॉँग्रेसने एल्गार पुकारला आहे. ही करवाढ दुष्काळग्रस्त जनतेसाठी नसून फडणवीस सरकारच्या वर्षपूर्तीच्या जाहिरातबाजीसाठी आहे. या विरोधात मुंबई काँग्रेसने राज्यातील भाजपा-शिवसेना युती सरकारच्या निर्णयाविरोधात सोमवारी भव्य बैलगाडी मोर्चा काढला. या मोर्चात हजारो मुंबईकरांनी उत्स्फूर्त सहभागी होऊन फडणवीस सरकारचा जाहीर निषेध केला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. पेट्रोल आणि डिझेलवर २ रुपये प्रतिलिटर अधिभार आकारणा-या युती सरकारच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी हा भव्य बैलगाडी मोर्चा काढला होता. राज्यातील मतदारांना ‘अच्छे दिन’ची आश्वासने देऊन फडणवीस सरकार सत्तेत आले. या सरकारकडून महाराष्ट्रातील जनतेची सपशेल फसवणूक केली जात आहे.

सरकारच्या घोषणांमुळे सरकारी तिजोरीत निर्माण झालेली आर्थिक तूट भरून काढण्यासाठीच सरकारने हातसफाई करून पेट्रोल आणि डिझेलवर अधिभार लावला. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईचा सामना करावा लागणार आहे. त्याचा धिक्कार करण्यासाठी मुंबई काँग्रेसने हा बैलगाडी मोर्चा काढला होता.

भाजपा सरकारच्या कामकाजाची पद्धत पाहिली तर ही करवाढ राज्य सरकारच्या पहिल्या वर्धापनदिनाच्या दिवशी मोठया प्रमाणात जाहिरातबाजी करण्यासाठी करण्यात आलेली आहे. आपल्या तथाकथित कामगिरीचा ढोल बडविण्यासाठी राज्य सरकार मोठया प्रमाणात जाहिरातबाजी करणार आहे. त्याचा खर्च भरून काढण्यास मंत्रिमंडळाने पेट्रोल आणि डिझेलवर दरवाढ केलेली आहे, असा आरोप संजय निरुपम यांनी केला.

या भव्य बैलगाडी मोर्चामध्ये माजी खासदार एकनाथ गायकवाड, आमदार कालिदास कोळंबकर, अस्लम शेख, अमिन पटेल, वर्षा गायकवाड, माजी आमदार अशोक जाधव, बाबा सिद्दिकी, चंद्रकांत हंडोरे, शाम सावंत, चरणसिंग सप्रा, मुंबई महिला काँग्रेस अध्यक्षा शीतल म्हात्रे, निजामुद्दीन राईन, युथ काँग्रेसचे अध्यक्ष गणेश यादव, पक्षाचे ज्येष्ठ नेते, नगरसेवक आणि नगरसेविका, मुंबई काँग्रेसचे पदाधिकारी, युथ काँग्रेसचे कार्यकर्ते, सेवादल तसेच मोठया संख्येने काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते. जोरदार घोषणांनी आझाद मैदान परिसर दणाणून गेला होता. विविध मान्यवरांनी त्यांच्या भाषणात सरकारवर जोरदार टीका केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *