वैद्यकशास्त्रासाठीचे २०१५ सालचे नोबेल पुरस्कार जाहीर झाले आहेत. विल्यम कॅम्पबेल, सॅटोशी ओमुरा आणि युयु टू यांना यंदाच्या वर्षीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
कॅम्पबेल आणि ओमुरा यांना परजीवी जंतूंमुळे होणा-या संसर्गावर प्रभावी औषधासाठी तर, युयु टू यांना मलेरीयावरील औषधासाठी नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. कॅम्पबेल आणि ओमुरा यांनी अव्हरमेक्टिन औषध बनवले तर, युयु टू यांच्या औषधामुळे मलेरीयाच्या आजारामुळे रुग्णांचा मृत्यूदर कमी झाला.
या दोन शोधांचा कोटयावधी जनतेला फायदा झाला असून, यामुळे मानवी आरोग्यात सुधारणा झाली आहे असे नोबेल पुरस्कार समितीने म्हटले आहे. या आठवडयात जे नोबेल पुरस्कार जाहीर होतात त्यात औषध शास्त्रासाठीचे नोबेल प्रथम जाहीर होते.
भौतिक, रसायन आणि शांततेचे नोबेल या आठवडयाच्या अखेरपर्यंत जाहीर होतील. अर्थशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार सोमवारी जाहीर होईल. साहित्यासाठीच्या नोबेल पुरस्कारासाठीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. पण हा नोबेल पुरस्कार गुरुवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. मागच्यावर्षीही औषधशास्त्रासाठीचा नोबेल तीन वैज्ञानिकांना जाहीर झाला होता.

