रायगडच्या तळा तालुक्यात भीषण अपघात घडला आहे. ट्रेलर आणि एसटी बसची जोरदार धडक झाली. गुरुवार ८ मे ला दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी हा अपघात घडला आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर १० पेक्षा अधिकजण जखमी झाल्याचे समजते. पोलिसांनी घटनास्थळ गाठले असून पंचनामा सुरु आहे.
वृत्तानुसार, तळयाकडून अगरदांडयाच्या दिशेने निघालेल्या ट्रेलरने रहाटाड कडून येणाऱ्या एसटीबसला जोरदार धडक दिली. तारणे येथील तीव्र वळणावर हा अपघात घडला आहे. अपघात एवढा भयानक होता की, एसटी बस एका बाजूने पूर्णपणे चिरली गेली. सदरच्या अपघाताची नोंद तळा पोलीस ठाण्यात करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालय दाखल करण्यात केले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तृप्ती विजय खुटीकर, (22 वर्षे) रा. रहाटाड कोळीवाडा, लक्ष्मण राया ढेबे (38 वर्ष) रा. धनगरवाडी, अनन्या कपेश गमरे (7 वर्ष) रा. आंबेत, विठ्ठल धोंडू कजबते (55 वर्ष) रा. खांबवली अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी रवाना केले आहेत.
तर, काशिनाथ जानू ढेबे रहाटाड (वय 52), सविता शांताराम गायकवाड (वय 45) खांबवली, यशवंत नारायण रामाणे (वय 77) भोईवाडी तळा, लक्ष्मण नाग्या घायरी (वय 60) रहाटाड कोळीवाडा, सविता शांताराम गायकवाड तंग (वय 45) खांबवली, वैष्णवी विजय फुटेकर (वय 25) खांबवली तळा, ससुबाई तुकाराम गायकवाड (वय 25) रहाटाड तळा, जयश्री नामदेव गवाणे (वय 60) रहाटाड तळा, संगीता अंकुश जाधव (वय 40) रहाटाड तळा, मोरेश्वर ढेबे (वय 19) हे गंभीर जखमी झाले आहेत.
