बीडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. १९ वर्षीय गर्भवतीचा रुग्णालयात येण्यापूर्वी रस्त्यातच मृत्यू झाला आहे. वय अवघे १९ आणि पोटात दोन बाळ, अचानक पोटात दुखायला लागल्याने गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथून बीडला रेफर केले. परंतु, जिल्हा रुग्णालयात येण्यापूर्वीच गर्भवतीचा रस्त्यातच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी घडली. आरोग्य विभागाने याची नोंद घेतली असून, याचे अन्वेषण केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, गर्भवती ही कामासाठी रायगड जिल्ह्यातून गेवराई तालुक्यात दीड महिन्यापूर्वी आल्याची प्राथमिक माहिती आहे.
गौरी हिरामन भोवी (वय १९, रा. खोपोली, जि. रायगड) असे मयत गर्भवतीचे नाव आहे. ती पती आणि इतर काही लोकांसह कामाच्या शोधात गेवराई तालुक्यातील सुरळेगाव, गुळज येथे आली होती. साधारण दीड महिन्यापासून ती गेवराईत आली होती. ती पहिल्यांदाच गर्भवती होती. तिची प्राथमिक तोंडी माहिती घेतली असता जुळे मुले असल्याचे सांगण्यात आले होते. ३६ आठवड्यांचा गर्भ झाल्यानंतर ५ मे रोजी सकाळी तिच्या पोटात अचानक दुखायला सुरूवात झाली. त्यानंतर नातेवाईकांनी तातडीने तिला गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथून प्रथमोपचार करून तिला जिल्हा रुग्णालयात रेफर केले. परंतु, रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. बीडमध्ये आल्यावर डॉक्टरांनी तपासून गौरी यांना मयत घोषित केले. त्यानंतर तिचे शवविच्छेदन करण्यात आले.