पाकिस्तानसोबत लढण्यासाठी आता आपण सगळे सज्ज झालोय. या युद्धसज्जतेसाठी राज्यातही उद्या 16 ठिकाणी मॉकड्रिल होणार आहे. त्यामुळे प्रशासनाकडून या सगळ्या अनुषंगाने तयारी करण्यात आली आहे. युद्धजन्य परिस्थिती कशा पद्धतीने हाताळली जाऊ शकते, याची चाचणी मॉक ड्रिलच्या माध्यमातून केली जाणार आहे.
पाकिस्तानसोबत लढण्यासाठी महाराष्ट्र तयार झाला आहे. महाराष्ट्रातल्या सोळा ठिकाणी मॉक ड्रिल करण्याचे आदेश केंद्र सरकारनं दिले आहेत. महाराष्ट्रातल्या मुंबई, उरण, तारापूर, ठाणे, नाशिक, मनमाड, सिन्नर, रायगड, रोहा, धाटाव, नागोठणे थळ, वायशेत, रोहा, संभाजीनगर, पिंपरी चिंचवड, पुणे, भुसावळ, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आहे. केंद्राच्या मॉकड्रिलआधी महाराष्ट्रानं मात्र त्या आधीच तयारी केली असून दादरच्या डिसिल्व्हा हायस्कूलमध्ये मॉक ड्रिल करण्यात आलं आहे. यावेळी शत्रूंच्या विमानांची वर्दी देण्यासाठी सायरन वाजवण्यात आला. महाराष्ट्रातली अनेक ठिकाणं शत्रूच्या यादीत असण्याची शक्यता आहे. त्यामुळंच तिथल्या लोकांचा प्रशिक्षण देण्यासाठी ही रंगीत तालीम घेण्यात येते आहे. महाराष्ट्रात जवळपास 10 हजार नागरी संरक्षण स्वयंसेवक आहेत. या सगळ्या स्वयंसेवकांची फौज ऑनग्राऊंड असणार आहे.
दुसरीकडे ठिकठिकाणच्या जिल्ह्याधिकाऱ्यांना मॉकड्रिलसाठी सज्ज राहण्याच्या सूचना मंत्रालय़ातून देण्यात आल्या आहेत. शिवाय आवश्यक ती यंत्रणा आणि सामुग्रीही पुरवण्यात आली आहे. मॉकड्रिलसाठी महाराष्ट्रातील 16 ठिकाणं निवडण्यात आली आहेत. ही ठिकाणं देशाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची आहेत. शिवाय ती पश्चिम सीमेजवळ असल्यानं या सोळा ठिकाणी मॉकड्रिल होणार असल्याचं संरक्षणतज्ज्ञ सांगत आहेत.
नाशिकमध्येही नागरी आणि लष्करीदृष्ट्या अतिशय संवेदनशील ठिकाणं आहेत. मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात 9 ठिकाणी सायरन बसवण्यात आले आहेत. जळगावमधील भुसावळ रेल्वे जंक्शन आणि तेल डेपो आहे. त्यामुळं तिथंही मॉकड्रिल होणार आहे. त्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
जेव्हा जेव्हा पाकिस्ताननं भारताची कुरापत केलीय तेव्हा तेव्हा हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून जातो. आताही पाकिस्तानचा मुकाबला करण्यासाठी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांनी कंबर कसली आहे. महाराष्ट्र पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीच्या कोणत्याही मोहिमेसाठी आता सज्ज झाला आहे.
