भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या एअरस्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. या कारवाईत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचं वृत्त आहे. भारताने राबवलेल्या मोहिमेला ‘Operation Sindoor’ असे नाव देण्यात आल्याने भारतीयांची छाती अभिमानाने फुलून आली आहे. पहलगाम येथील भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या डोंबिवली येथील संजय लेले यांच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
काय म्हणाला हर्षल लेले?
पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संजय लेले यांचा मुलगा हर्षल लेले याने अत्यंत समाधानी असल्याची भावना व्यक्त केली आहे. जिथून आतंकवादी निघतात, त्या 9 जागांना टार्गेट केलेलं आहे, अशाच आणखी कारवाया व्हाव्यात ही इच्छा आहे, यांना पूर्ण नेस्तनाबूत करुन टाकलं पाहिजे. एक हजाराहून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं पाहिजे, अशी इच्छा हर्षल संजय लेले याने बोलून दाखवली.
‘बाबांना शांती मिळाली असेल’
या घटनेमुळे बाबांना शांती मिळाली असेल, हे बघून आम्हालाही बरं वाटलं. बाबा, माझे दोन्ही मामा आणि इतर 26 जणांनाही शांती मिळाली असेल. माझे बाबा देशासाठी मृत्युमुखी पडले. पाच वर्षांपूर्वी पुलवामा हल्ल्याचा सरकारने सूड घेतल्यानंतर माझ्या बाबांनी मला मिठी मारली होती, म्हणजेच त्यांना देशाची खऱ्या अर्थाने काळजी होती, त्यामुळे ते निश्चितच आनंदी असतील, अशा भावनाही हर्षल लेले याने व्यक्त केल्या.
