कुर्ला साकीनाका येथील खैरानी रोड परिसरात उघड्या मॅनहोलमध्ये (मनुष्य प्रवेशिका) पडून एका ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना २ जुलैला घडली होती. यानंतर संबंधित कंत्राटदाराला ‘काळ्या यादी’त टाकण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले होते. त्याच दिवशी कंत्राटदाराला ‘कारणे दाखवा’ नोटीसही बजावण्यात आली. मात्र सात दिवसांनंतरही कंत्राटदाराने त्यावर उत्तर दिलेले नाही. त्यामुळे कंत्राटदाराला ‘काळ्या यादी’त टाकण्याची प्रक्रियाच रखडली आहे.
मुंबई महापालिकेच्या एल वॉर्डमधील कुर्ला साकीनाका खैरानी रोड परिसरात मलनिस्सारण प्रचालन विभागांतर्गंत एका मॅनहोलवर संरक्षक जाळी बसवण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी रस्त्यावरून असलम इसाक शेख हे मोबाइलवर बोलत पायी जात होते. शेख मॅनहोलजवळ आले, त्यावेळी मॅनहोलजवळ कामासाठी उभ्या असलेल्या एका व्यक्तीने त्यांना आवाज देऊन थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेख यांचा तोल जाऊन ते मॅनहोलमध्ये पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी एल वॉर्डच्या सहाय्यक आयुक्तांसह चौघांचे निलंबन केले आहे. सुरक्षेत हलगर्जी करणाऱ्या संबंधित कंत्राटदारास ‘काळ्या यादी’त टाकण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले होते. मात्र अद्याप कारवाई झालेली नाही.
घटनेदिवशी मुंबई महापालिकेच्या एल वॉर्डकडून कंत्राटदाराला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली होती. या नोटिशीला कंत्राटदाराकडून उत्तर मिळाल्यानंतर त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येणार होती. यासाठी कंत्राटदाराला सात दिवसांची मुदतही देण्यात आली होती. मात्र कंत्राटदाराने या ‘कारणे दाखवा’ नोटिशीकडे सपशेल पाठ फिरवली आहे, कंत्राटदाराने नोटिशीला उत्तरच दिलेले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
‘नाल्यांवर ट्रॅश बूम बसवा’
‘मुंबईत पावसाळ्यात नाले आणि नद्यांमधून समुद्रात वाहून जाणारा कचरा रोखण्यासाठी सर्व नाले व नद्यांच्या मुखाशी ट्रॅश बूम उभारावेत आणि तेथे अडविण्यात आलेला कचरा उचलण्यासाठी वर्षभर २४ तास कार्यरत यंत्रणा उभारावी,’ अशी मागणी मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी महापौर रितू तावडे व महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
