कल्याणमध्ये इमारत कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. अगदी पत्त्यांच्या बंगल्यासारखी ही भलीमोठी इमारत कोसळली आहे. इमारतीचा कोसळतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत जवळपास चार ते पाच मजल्यांची ही इमारत जागेवरतीच कोसळताना दिसत आहे. हे दृश्य चित्तथरारक आणि थरकाप उडवणारी आहेत. सुदैवाने या इमारत दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही इमारत रि-डेव्हलोपमेंटला गेली होती. टप्प्याटप्प्याने तिचं पाडकाम केलं जात होतं. पण दुपारच्या सुमारास ही इमारत अगदी पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली.
या इमारतीत कुणीही वास्तव्यास नव्हतं. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण या इमारतीचा मलबा थेट रस्त्यावर देखील आला. यावेळी रस्त्याने जाणारी कुठली गाडी नसल्याने कुणालाही दुखापत झाली नाही. घटना घडली तेव्हा बाजूला राहणाऱ्या नागरिकांनी जीव मुठीत घेत घरातून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी थेट खिडकीतून घरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने त्यात त्यांना यश आले. त्यामुळे ते या घटनेत बचावल्याची चर्चा आहे.
या घटनेचे व्हिडीओ अतिशय धक्कादायक आहेत. त्यामुळे आता या घटनेवर प्रशासनाकडून काय प्रतिक्रिया दिली जाते? ते पाहणं महत्त्वाचं आहे. विशेष म्हणजे केडीएमसी महापालिकाचे अधिकारी आणि विकासक यांच्यात याबाबतची कारवाई करताना समन्वय होते का? ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे. तसेच या भयावह घटनेत कुणाचा जीव गेला असता तर त्याला जबाबदार कोण राहिलं असतं? असादेखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय.
स्थानिकांचा संरक्षणात्मक उपाययोजना नसल्याचा आरोप
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाडकामाच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था आणि संरक्षणात्मक उपाययोजना नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
दरम्यान, या घटनेवर आता कल्याणमधील लोकप्रतिनिधींकडून काही प्रतिक्रिया येते का? तसेच या प्रकरणी कुणावर कारवाई केले जाते का? ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे. तसेच या इमारतीत दुर्घटना घडली तेव्हा खरंच कुणीही नव्हते का? याचीदेखील खातरजमा करणे आवश्यक आहे. या प्रकरणी पोलीस आणि इतर यंत्रणाकडून खरंच काही कारवाई केली जाते का? ते पाहणं आता महत्त्वाचं आहे.
