ठाण्यात लवकरच हवाई टॅक्सी धावणार; ‘या’ मार्गावरील प्रवास होणार हायटेक

मुंबईसह ठाण्यातदेखील रहिवाशांची संख्या वाढली आहे. तसंच, ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात प्रकल्पांची उभारणी केली जात आहे. गर्दी वाढल्याने  वाहतूक कोंडीदेखील वाढली आहे. ठाण्यातील वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणजे हवाई (पॉड) टॅक्सीचा पर्याय लवकरच नागरिकांसमोर येणार आहे. भविष्यातील अत्यंत सुलभ आणि किफायतशीर वाहतूक व्यवस्था असणार आहे. याबाबत लवकरच प्रकल्प मार्गी लागणार असून महानगर पालिकेकडे सर्वेक्षण करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे.

ठाणे शहराची लोकसंख्या 25 लाखांच्या पुढे आहे. भविष्यात रस्ते वाहतुकीला  अनेक मर्यादा येऊ शकतात. त्यामुळं रस्ते वाहतुकीवरील कोंडी दूर करण्यासाठी हवाई टॅक्सीचा प्रयोग राबवण्यात येणार आहे. वडाळा ते गायमुख हा मेट्रो मार्ग पुढील वर्षापर्यंत सुरू होणार आहे. ठाणे शहरातील कापूरबावडी ते गायमुख परिसरात मेट्रोला कनेक्टिव्हिटी देण्याच्या दृष्टीने हवाई टॅक्सी हा एक उत्तम पर्याय असू शकतो.

हवाई (पॉड) टॅक्सीचा प्रयोग ठाणे व मीरा-भाईंदर पालिका क्षेत्रामध्ये राबवण्याचा सरकारचा मानस आहे. ठाणे शहरात हवाई टॅक्सीसंदर्भात सर्वेक्षण करण्यात येणार आहे. घोडबंदर रोडवरील भाईंदर पाडा येथे विहंग हिल्स परिसरातील 40 मीटर रस्त्यावर हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबवण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

पॉड टॅक्सी म्हणजे काय?

पॉड टॅक्सी ही इलेक्ट्रिक वाहन असून ते चालकविरहित वाहतुकीचे साधन आहेत. या छोट्या ऑटोमेटेड कार आहेत ज्या मूठभर प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जास्त वेगाने नेण्यासाठी डिझाइन केल्या आहेत.

बीकेसी ते कुर्ला पॉड टॅक्सी

वांद्रे ते कुर्ला स्थानका दरम्यान वांद्रे कुर्ला संकुलामधून पॉड टॅक्सी धावणार असून त्याचे अंतर 8.80 कीमी एवढी आहे. त्यामध्ये 38 स्थानके असणार आहेत. प्रति पॉड सहा प्रवाशी एवढी त्याची क्षमता आहे. कमाल 40 किमी प्रति तास एवढा त्याचा वेग असणार आहे. याप्रकल्पामुळे वांद्रे स्थानक ते बीकेसी हा प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *