कॉमर्सला अ‍ॅडमिशन घेताय! यंदा ‘कट ऑफ’ वाढणार, पदवी प्रवेशासाठी चुरस

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सोमवारी बारावीचा निकाल जाहीर केला. राज्याचा यंदाचा निकाल 91.88 टक्के इतका लागला असून पुन्हा एकदा कोकण विभाग अव्वल ठरला आहे. तर, मुलींनीच यंदा बाजी मारली आहे. 94.58 टक्के मुली यंदा उत्तीर्ण झाल्या आहेत. तर, मुलांच्या तुलनेत 5.07 टक्के मुली उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त आहे. तसंच, मुंबईत यंदा 10 टक्क्याहून अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळं यंदाही पदवीच्या प्रथम वर्षाकरिता कॉलेजांमध्ये प्रवेशासाठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळं कॉमर्स शाखेचा कट ऑफ यंदाही अधिक असू शकतो.

यंदा मुंबई विभागात 4,525 विद्यार्थ्यांना 90 टक्क्याहून अधिक गुण मिळाले आहेत. तर 26,098 विद्यार्थ्यांना 80 टक्क्याहून अधिक गुण मिळाले आहेत. त्यामुळं याचाही परिणाम प्रवेशाच्या कट ऑफवर होणार आहे.मुंबई मंडळातून यंदा दोन लाख ९१ हजार ९५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात वाणिज्य शाखेतून उतीर्ण झालेले एक लाख ५२ हजार ८६२ विद्यार्थी आहेत. मुंबई विद्यापीठात पदवीच्या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी यंदाही तीन लाखांहून अधिक जागा असल्या तरी नामांकित कॉलेजांमधील वाणिज्य आणि कला शाखांना विद्यार्थ्यांचा अधिक ओढा राहील.

पदवीसाठी वाणिज्य शाखेच्या बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, बॅचलर ऑफ अकाउंट अँड फायनान्स, बॅचलर ऑफ बॅकिंग अँड इन्शुरन्स या व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा ओढा अधिक असतो. कला शाखेतील मानसशास्त्र, अर्थशास्त्र, परदेशी भाषा, बीएमएम अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची पसंती असते.

विद्यार्थ्यांसाठी राज्य मंडळाकडून समुपदेशकांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी – मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 12 वीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. निकालानंतर अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने मानसिक दडपणाखाली येण्याची शक्यता असते. त्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी तसेच पुढील परीक्षेसाठी तयार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत पुढील आठ दिवस समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. हे समुपदेशक सकाळी 8 ते रात्री 8 या कालावधीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *