मध्य प्रदेशातील गुना येथील 15 वर्षीय अभ्युदय जैनच्या मृत्यूनंतर एकच खळबळ उडाली होती. सुरुवातीला हे हत्येचं प्रकरण असल्याचं मानण्यात आलं होतं. पण आता विशेष तपास समितीने (SIT) केलेल्या तपास आत्महत्या असल्याचं समोर आलं आहे. एसआयटीचा तपास आणि भोपाळच्या गांधी मेडिकल कॉलेजच्या मेडिको-लीगल रिपोर्टने या प्रकरणाला नाट्यमयरित्या वळण दिलं आहे. मुलाच्या हत्येच्या आरोपाखाली गेल्या 58 दिवसांपासून तुरुंगात असणाऱ्या अलका जैन यांना एसआयटीने निर्दोष ठरवलं आहे. नवीन शवविच्छेदन अहवालात मृत्यूचं कारण पार्शियल हँगिंग म्हणजेच अर्धवट गळफास असल्याचं नमूद आहे. म्हणजेच शवविच्छेदन अहवालाने ही आतमहत्या असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र या खुलाशामुळे पोलिसांचा प्राथमिक तपास आणि वैद्यकीय प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
14 फेब्रुवारी 2025 रोजी गुना येथील चौधरन कॉलनीमधील भाड्याच्या घरात राहणाऱ्या अभ्युदय जैनचा मृतदेह बाथरुममध्ये आढळला होता. गळ्यात दुपट्टा आणि पायाला रशी बांधली असल्याने सुरुवातीला आत्महत्येचा संशय आला.
बँक ऑडिटर असणारे अभ्युदयचे वडील त्यावेळी भोपाळमध्ये होते. त्यांची पत्नी अलका जैन यांनी आपण सकाळी बँडमिंटन खेळायला गेले होते आणि परतली तेव्हा दरवाजा आतून बंद होता असं सांगितलं. वारंवार दरवाजा ठोठावूनही आणि फोन केल्यानंतरही काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर घऱमालकाच्या मदतीने दरवाजा उघडला असता, आतमध्ये अभ्युदयचा मृतदेह आढळला.
पोलिसांचा प्राथमिक तपास
जिल्हा रुग्णालयाच्या तीन डॉक्टरांनी शवविच्छेदन केल्यानंतर गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचं सांगितलं. पोलिसांनी सीसीटीव्ही, कॉल डिटेल्स आणि साक्षीदारांचे जबाब तपासले. बाहेरची कोणतीही व्यक्ती घरात प्रवेश करताना त्यांना आढळली नाही. पोलिसांना तपासात समजलं की, अभ्युदय आपल्या आईच्या तिच्या लाईफस्टाईलवरुन नेहमी बोलत असे, ज्यामुळे त्यांच्यात वाद व्हायचा.
या पुराव्यांच्या आधारे 22 फेब्रुवारीला हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि 8 मार्चला अलका जैन यांना अटक करण्यात आली. अलका यांनी रागाच्या भरात मुलाचा गळा दाबला आणि नंतर ती आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पोलिसांकडून करण्यात आला.
अभ्युदयचे वडील अनुपम जैन यांनी पोलीस तपास चुकीचा ठरवला आणि पत्नी निर्दोष असल्याचा दावा केला. त्यांनी प्रधानमंत्री कार्यालय, दिल्लीपासून पोलीस मुख्यालयापर्यंत सगळीकडे दाद मागितली. अनुपम यांनी 11 मुद्द्यांवर पुनर्तपासाची मागणी केली, ज्यात पोस्टमॉर्टेम रिपोर्ट, कॉल डिटेल्स आणि गुन्ह्याच्या ठिकाणाहून मिळालेले पुरावे यांचा समावेश होता, अखेर ग्वालियर रेंजचे डीआयजी अमित सांघी यांच्या नेतृत्वात एसआयटीचं गठन करण्यात आलं.
नवा शवविच्छेदन अहवाल
एसआयटीने भोपाळच्या मेडिकल कॉलेजच्या शवविच्छेदन अहवालाची नव्याने तपासणी केली. डॉक्टरांच्या टीमने नव्या रिपोर्टमध्ये पार्शियल हँगिंग मृत्यूचं कारण असल्याचं सांगितलं, ज्यामुळे आत्महत्या असल्याचं स्पष्ट झालं.
अलका यांच्या कॉल रेकॉर्डवरुन त्या घटनेदरम्यान सतत फोनवर होत्या हे उघड झालं. फक्त 20 मिनिटांचं अंतर होतं जेव्हा कोणताही फोन आला नाही. एसआयटीनुसार, इतक्या कमी वेळात हत्या आणि त्याला आत्महत्येचं रुप देणं शक्य नव्हतं. तसंच घराचा दरवाजा बंद होता आणि चावी टेबलावर होती. सीसीटीव्हीत बाहेरची कोणतीही व्यक्ती आत प्रवेश करताना दिसत नाही.
मानसिक तणाव
अभ्युदय अभ्यासामुळे तणावात होता. तो आठवीत शिकत होता आणि दोन विषयात अनुत्तीर्ण झाला होता. घटना घडली त्यादिवशी त्याला हिंदी विषयात 80 पैकी 28 गुण मिळाले होते. आई-वडील त्याच्या अभ्यासावरुन चिंतेत होते, ज्यामुळे तो तणावात होता. एसआयटीने आपल्या तपासात अलका यांनी निर्दोष ठरवलं आहे
