घरात लग्नाची सर्व तयारी झाली होती. सर्व पाहुणे आलेले होते. नवरीला हळद लागली, सगळे मांडवात आनंदोत्सव साजरा करत होते. संगीतचा कार्यक्रम झाला, रात्री डीजे लावून नाचत होते. यावेळी नवरीही तिचं लग्न एन्जॉय करत होती, नाचत होती. मात्र, काहीच क्षणात असं काही झालं की या आनंदाच्या घरावर शोककळा पसरली. काही वेळापूर्वी आपल्या हळदीच्या कार्यक्रमात नाचणारी नवरी अचानक बाथरुममध्ये जाऊन कोसळली आणि काहीच क्षणात तिचा श्वास थांबला. ही घटना उत्तर प्रदेशातील बदायूं येथे घडल्याची माहिती आहे. लेकीचा अशाप्रकारे लग्नाच्या आदल्या रात्रीच मृत्यू झाल्याने कुटुंबाने एकच आक्रोश केला.
इस्लामनगर बदायूंच्या नूरपूर पिनौनीच्या गावात लग्न समारंभाची तयारी सुरु होती. दिनेश पाल सिंग यांची २४ वर्षांची मुलगी दीक्षाचं सोमवारी (५ मे) लग्न होतं. मात्र, त्यापूर्वीच तिच्यासोबत असं काही घडलं की सारेच सुन्न झाले. लग्नाच्या आदल्या रात्री दीक्षाला हळद लागण्याचा कार्यक्रम सुरु होती. यावेळी दीक्षा आपल्या बहिणी आणि नातेवाईकांसोबत नाचत होती.
