संभाजीनगर हादरलं! ‘या’ कारणासाठी 4 वर्षांच्या दत्तक मुलीला आई-बापाने संपवलं; हाडं मोडेपर्यंत..

छत्रपती संभाजी नगरमधील सिल्लोड येथे आई-वडिलांनीच दत्तक मुलीला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे चार मुलं असल्याने मुलगी हवी म्हणून दत्तक घेतलेल्या चार वर्षाच्या चिमुकलीला मारहाण करुन तिचे हात-पाय मोडेपर्यंत तिला मारहाण करत या दांपत्याने तिची हत्या केली.

हात-पाय मोडले

चारही मुलेच असल्याने सहा महिन्यांपूर्वी 5 हजार रुपयांमध्ये विकत घेतलेल्या चार वर्षीय चिमुकलीची पती, पत्नीने बेदम मारहाण केली. या चिमुकलीचे हात-पाय मोडून तिच्या अंगावर चटके देत तिची अमानुष पद्धतीने हत्या केल्याची घटना सिल्लोडमध्ये समोर झाली आहे. याप्रकरणी सिल्लोड शहर पोलिसांनी आई-वडिलांच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या पती-पत्नीला अटक केली आहे. या दोघांविरुद्ध पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आयात फईम शेख असे मयत चिमुकलीचे नाव आहे. तर आयातचा जीव घेणाऱ्या आईचं नाव फौजिया शेख फईम असून तिचा पती शेख फईम शेख आयुबने तिला या गुन्ह्यात मदत केली.

5 हजार रुपयांमध्ये घेतलेलं विकत

अजिंठा येथील शेख फईम शेख आयुब व फौजिया शेख फईम या दांपत्याला चार मुले आहेत. दोघांनाही मुलगी नसल्याने त्यांनी चार वर्षीय आयातला दत्तक घेतलं. जालना येथून शेख नसीम अब्दुल कायुम यांच्याकडून 5 हजार रुपयांमध्ये आयातला या दोघांनी विकत घेतलं. बॉण्ड पेपरवर व्यवहार करून आयातचं पालकत्व त्यांनी स्वीकारलं. मोलमजुरी करणारे हे कुटुंब 15 दिवसांपूर्वी सिल्लोड येथील मुगलपुरा भागात राहायला आले होते.

…म्हणून सुरु केला छळ

आयातला दत्तक घेणे फौजियाला आवडले नसल्याने तिचा पतीसोबत या विषयावरुन नेहमी वाद होत होता. दोघांमधील वादाचं कारण ठरत असलेल्या आयातला दोघांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली.

जळत्या लाकडाचे चटके दिले

सिल्लोड येथे आल्यापासून या दांपत्याने आयातचा अमानुष छळ सुरू केला. दोघेही या चार वर्षाच्या चिमुकलीला उपाशी ठेवायचे. बुधवारी रात्रीही जळत्या लाकडाने तिच्या पूर्ण अंगावर दोघांनी चटके दिले. तिचे हात व तळ पाय सांध्यातून मोडेपर्यंत तिला मारहाण करण्यात आली. त्यानंतर तिच्या डोक्यात व पाठीत कशाने तरी जोराने वार करुन तिला गंभीर जखमी करण्यात आलं. विव्हळत असलेल्या चिमुकलीने अखेर बुधवारी मध्यरात्री तीन वाजता प्राण सोडले. मुलीला दत्तक घेऊन अशाप्रकारे हत्या करण्यामागे इतर काही कारणं आहेत का याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *