देशभरात वंदे भारत एक्स्प्रेसचे जाळे विणले जात आहे. अनेक प्रवासी वंदे भारत एक्स्प्रेसला पसंती देऊ लागले आहेत. प्रवाशांकडून मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता देशातील तिसऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचा एक थांबा वाढविण्यात आला आहे. त्यामुळे गुजरातमधील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
देशातील तिसऱ्या क्रमांकाची आणि पश्चिम रेल्वेवरील पहिली वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई सेंट्रल – गांधीनगरदरम्यान धावते. अत्यंत कमी कालावधीत या वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या वंदे भारतला पश्चिम रेल्वेवरील गुजरातमधील आनंद स्थानकावर प्रायोगिक तत्वावर नुकताच अतिरिक्त थांबा देण्यात आला. आनंद स्थानकावर अतिरिक्त थांबा दिल्याने मुंबई सेंट्रल आणि अहमदाबाद स्थानकावरील गाडी क्रमांक २०९०२ गांधीनगर – मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
