कुणाल कामरा हाजीर हो! मुंबई पोलिसांचं पुन्हा समन्स, आणखी वेळ देण्याची विनंती नाकारली

कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवणारं एक गाणं त्याच्या कॉमेडी शोमध्ये सादर केलं. ज्यानंतर चांगलाच वाद निर्माण झाला आहे. कुणाल कामराच्या विरोधात पोलिसात गुन्हाही दाखल झाला आहे. मुंबई पोलिसांनी त्याला समन्स बजावलं होतं पण तो चौकशीसाठी हजर राहिला नाही. आता मुंबई पोलिसांनी त्याला पुन्हा समन्स बजावलं आहे. तसंच यावेळी वाढीव मुदत देण्यासाठी पोलिसांनी नकार दिला आहे. यामुळे कुणाल कामराच्या अडचणी वाढण्याची चिन्हं आहेत.

कुणाल कामराला दुसरं समन्स

कुणाल कामराला मुंबई पोलिसांनी दुसरं समन्स बजावलं आहे. कुणाल कामराने चौकशीसाठी यावं यासाठी त्याला पहिलं समन्स बजावण्यात आलं होतं पण तो हजर राहिला नाही. आता त्याला पुन्हा समन्स बजावण्यात आलं आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता हजर राहण्यासंदर्भात मुंबई पोलिसांनी कुणाल कामराला पहिलं समन्स पाठवलं होतं. पण तो हजर राहिला नाही. आता एकनाथ शिंदेंबाबत केलेल्या वक्तव्यावरुन आणि त्या गाण्यावरुन त्याला पुन्हा समन्स बजावण्यात आलं आहे.

कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता एक गाणं तयार केलं होतं ज्यात त्यांचा उल्लेख गद्दार असा केला होता. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. कुणाल कामराने ज्या हॉटेलमध्ये शो केला त्या ठिकाणी असलेल्या स्टुडिओचीही तोडफोड करण्यात आली. दरम्यान कुणाल कामराने या प्रकरणात चौकशीला येण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे. त्याने त्याच्या वकिला करवी तशी विनंती केली. मात्र पोलिसांनी ही विनंती फेटाळली आहे. दरम्यान मुंबई पोलिसांनी या प्रकरणात हॅबिटट स्टुडिओ तसंच या शोशी संबंधित असलेले इतर लोक यांनाही चौकशीसाठी समन्स बजावलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *